कराड | तालुक्यातील काले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाई, स्वीपर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्यात कामचुकार आणि हाणामारीला ग्रामस्थ कंटाळले आहेत. आरोग्य केंद्रात येणाऱ्या रूग्णाला सेवा देण्याऐवजी कर्मचारी आपआपसातील भांडणे करत असल्याने त्याचा नाहक त्रास रूग्णांना व त्याच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. आरोग्य केंद्रातील या प्रकारामुळे काले ग्रामस्थांनी केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
काले येथील आरोग्य केंद्र स्वच्छतेसाठी व सेवेसाठी नावारूपाला आलेले आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांच्यात रोज हाणामारी होताना दिसत आहे. रूग्ण व नातेवाईकांच्या समोर शिवीगाळ, कामातील कामचुकारपणामुळे रुग्णांची हेळसांड सुरू आहे. तेव्हा अशा कामचुकारांची तातडीने बदली करावी, अशी मागणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केलेली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या केंद्रातील काही कर्मचारी दवाखान्याच्या पाठीमागील असलेल्या इमारतीत राहतात. आठ दिवसांपासून शिपाई, स्वीपर व कर्मचारी यांची रोजच कडाक्याची भांडणे होत आहे. तर या भांडणात अश्लील शिवीगाळही होत आहे. भांडणे इतकी जोरात आहेत की एकाची चावा घेण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यांच्या कामात अनियमितताही असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
कर्मचाऱ्यांच्या रोजच्या भांडणांना रुग्ण त्यांच कंटाळले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या इमारतीशेजारी राहणाऱ्या लोकांनी वैद्यकीय अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायतीकडे तक्रार करून त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी या तिघांना वारंवार सूचना दिल्या आहेत. मात्र, हे कर्मचारी कोणाचेच ऐकत नाहीत. आरोग्य केंद्रातील बेशिस्त वर्तन करून तेथील वातावरण दूषित केले जात आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णांना सेवा देतानाही त्यांच्याकडून योग्य पध्दतीने दिली जात नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बदली करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे कारवाईची मागणी करणार : सरपंच अफताब मुल्ला
आरोग्य सभापतींना तालुका व जिल्हास्तरावर निवेदन देवून बदलीची मागणी करणार आहोत. या कर्मचाऱ्यांमुळे काले गावचे व आरोग्य केंद्राचे नावाला गालबोट लागत आहे. त्यामुळे गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी. तसेच त्याची बदली करावी अशी मागणी काले गावचे सरपंच अफताब मुल्ला यांनी केलेली आहे.