व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराड बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा; उंडाळकर गटाला 12 तर राष्ट्रवादी-भाजप युतीला 6 जागा, भोसले अन् पाटलांचा ‘बाजार’ उठला…

कराड प्रतिनिधी | संतोष गुरव
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी लढत झाली. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाने माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील व भाजप नेते डॉ. अतुल भोसले गटाचा धुव्वा उडवला. या निवडणुकीत उंडाळकर गटाला १२ तर राष्ट्रवादी-भाजप युतीला ६ जागा मिळाल्या.

आज सकाळी अकरा वाजता निवडणूक निरीक्षक तहसीलदार विजय पवार, निवडणुक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांच्या उपस्थितीत मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात सोसायटी गटातील मतांची मोजणी होत असल्याने सुरुवातीलाच माजी मंत्री विलासकाका उंडाळकर गटाच्या रयत पॅनलच्या १२ उमेदवारांनी विजयाची पताका फडकविली आहे. तर शेतकरी विकास पॅनलच्या ६ उमेदवार निवडून आले आहेत मतमोजणीसाठी सात टेबलची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये मतदारांचा कौल हळू हळू स्पष्ट होत आहे. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

बाजार समितीच्या सोसायटी मतदार गटातील १८९९ पैकी १८४९ मतदारांनी मतदान केले. ग्रामपंचायत गटातील १९२२ मतदारापैकी १८७७ मतदान कले. व्यापारी गटातील ३७२ मतदारापैकी ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकुण ४१९३ मतदारापैकी ४०७५ मतदारांनी मतदान केल्याने सरासरी ९७.१९ टक्के मतदान झाले आहे