कराड नगरपालिका निवडणूक : कोण- कोणासोबत ठरेना त्यामुळे इच्छुकांना कुठे जायचं कळेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील

काॅंग्रेसचा हात, भाजपाचे कमळ आणि लोकशाहीची आघाडी ठरली. त्यासोबत यशवंत विकास आघाडी आणि जयवंतराव पाटील यांचा स्वतंत्र गट कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत असणार ठरलं. पण कोण- कोणासोबत ठरेना त्यामुळे इच्छुकांना कुठे जायचं हेच कळेना अशी परिस्थिती कराड नगरपालिकेच्या निवडणुकीला बाशिंग बांधलेल्याची झाली आहे.

कराड नगरपालिकेत काॅंग्रेस पक्षाच्या हात चिन्हावर तर भाजपाचे कमळ चिन्हावर लढण्याचे निश्चित केले आहे. कराड शहरात राष्ट्रवादी पक्षाकडून स्थानिक लोकशाही आघाडी म्हणून लढणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. राजेंद्रसिंह यादव यांच्या यशवंत विकास आघाडीनेही दंड थोपटले आहेत. अशावेळी जयवंतराव पाटील यांच्या स्वतंत्र गटानेही निवडणूक रिंगणात असणार हे निश्चित केले आहे. त्यामुळे आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांनी पक्ष आणि आघाड्याच्या नेत्याच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत.

पालिकेच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणत्याही आघाडीशी हातमिळविणीची चर्चा समोर आलेली नाही. त्यामुळे एकला चलो अशी भूमिका असल्याची चर्चा सध्यातरी दिसत आहे. भाजपामध्ये शहराध्यक्ष एकनाथ बागडी आणि पावसकर गटाकडूनही चिन्हावरच लढण्याचे संकेत दिले आहेत. परंतु भाजपाचे सरचिटणीस डाॅ. अतुल भोसले यांची गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या गटाशी गट्टी जमली आहे. त्यामुळे लोकशाही आघाडी आणि डाॅ. अतुल भोसले यांच्या गटाची भूमिका अद्याप उघडपणे समोर आलेली नाही. माजी नगराध्यक्षा रोहीणी शिंदे, माजी नगरसेवक महादेव पवार आणि त्यांचे बंधू सचिन पवार हे डाॅ. अतुल भोसले समर्थक असून काहीजण इच्छुक आहेत. राजेंद्रसिंह यादव यांचा यशवंत विकास आघाडीतून अनेक मागील टर्ममधील नगरसेवक, सभापती राहिलेले पुन्हा इच्छुक आहेत. अशावेळी नविन – जुन्याचा मेळ घालून कोणाशी हातमिळवणी करायची यांची चाचपणी सुरू आहे. परंतु अद्याप कोणासोबत जायचं हे पक्क नाही. माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांचा स्वतंत्र गट असला तरी इच्छुकांची संख्या वाढली असल्याने स्वतंत्रपणे लढायचे की कोणाला सोबत घ्यायचे याबाबत उघडपणे भूमिका घेतली नाही. आगामी 10 दिवसात इच्छुकांकडून दि. 22 पासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. अशावेळी शहरात कोण- कोणासोबत आघाडी करणार हे अद्याप ठरेना, त्यामुळे इच्छुकांना आपण कुठं जायचं हे कळेना अशी परिस्थिती सध्यातरी निर्माण झाली आहे.

Leave a Comment