कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील गोळेश्वर याठिकाणी नदीकडे असलेल्या उसाचे शेतामध्ये पाचोळ्यात सडलेल्या अवस्थेत १३ जुलै २०२१ रोजी एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह मिळून आलेला होता. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद झालेली होती. या तपासात इस्माईल शताबुद्धीन शेख (वय २५, मुळ रा. बालुग्राम ता. राधानगरी जि.साहबगंज, झारखंड) या पुरुषाचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या खुनातील आरोपीना शोधून काढले असून जुगारात हरलेले पैसे मिळवण्यासाठी खून झाल्याचे समोर आले असल्याची माहिती सातारचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक बन्सल म्हणाले की, कराड येथील खुनाचा उलघडा करण्यात कराड पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील आरोपी मोहंमद सेटु आलम हिजाबुल शेख (वय २३, रा. इर्शादटोला, ता. राजमहल जि. साहेबगंज राज्य झारखंड) याला कराड पोलिसांनी १ जुलै २०२१ रोजी रात्री अटक केलेले आहे.
या खुनातील आरोपीचा शोध घेणे हे पोलीसांसमोर एक आव्हान होते. तरीही कराड पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. तसेच गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत त्याला झारखंड येथून ताब्यात घेतली त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जुगारात हरलेल्या पैशाचा राग मनात धरून इस्माईल शेख यास चाकूने वार करून जीवे ठार केले. तसेच त्याचे जवळील ९ हजार ५०० रुपये काढून घेतल्याची कबूल संबंधित आरोपीने दिली.
तुटलेल्या चांदीच्या चेनवरून खूनाचा उलगडा –
घटनास्थळी मिळालेल्या वस्तुत एक तुटलेल्या चांदीची चेन होती. हि चेन यातील मृत्यू झालेल्या व्यक्तीची नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. प्राप्त चेन वरून कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, पोलीस नाईक एम. एम. खान, संदीप पाटील या पथकाने धागेदोरे लावून मृत्यू झाल्याच्या गावी झारखंड येथे जावून मृत्यूच्या तपासकामी संबंधीत काही इसमांना कराड येथे बोलवले होते. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता. त्यातील मोहंमद सेटु आलम हिजाबुल शेख याने जुगारात हरलेल्या पैशाचा राग मनात धरून इस्माईल शेख यास चाकूने वार करून जीवे ठार केले आहे तसेच त्याच्या जवळील ९ हजार ५०० रुपये काढून घेतले असल्याची कबुली दिली. त्यानंतर संबंधित आरोपी मोहंमद सेटु आलम हिजाबुल शेख (वय २३, रा. इर्शादटोला, ता. राजमहल जि. साहेबगंज राज्य झारखंड) यास १ ऑगस्ट रोजी रात्री अटक केली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे हे करत आहेत.