कराड पोलिस ठाण्यावर शेकडोचा मोर्चा : मलकापूरातील गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाईची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | लहान मुलांमधील भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या कारणावरून काल चौघांनी एका तरुणावर मलकापूर फाटा येथे धारदार शस्त्राने भरदिवसा वार केले. यामध्ये विश्वास येडगे हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान संशयित हल्लेखोर हे वारंवार शहरात दहशत माजवत आहेत. त्यासाठी पोलिसांनी त्यांच्यासह मलकापूरातील गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मलकापूर येथील धनगर समाजाच्या शेकडो नागरिकांनी आज गुरुवारी दि.16 रोजी सकाळी शहर पोलीसांना निवेदन देवून केली.

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्वजण मलकापूर आहिल्यानगर येथिल रहिवाशी असून मागील पिढ्यान पिढ्या अहिल्यानगर येथे राहतो. दिनांक 15/ 12/ 2021 रोजी आमचे समाजातील युवक विश्वास हणमंत थेडगे यांचेवर सकाळी ठिक 11.00 चे दरम्यान मलकापूर फाट्यावर शहरातील मटण विक्री दुकानदार विक्रम बरकडे याचे टोळीतील 5 युवकांनी धारधार शस्त्रांनी (कोयता व सत्तूर) प्राणघातक हल्ला केला आहे. मलकापूर शहर व आहिल्यानगर परिसर या घटनेने हादरून गेला असून आहिल्यानगर मधील धनगर समाजातील लोकांमध्ये यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सदर झालेली घटना ही तात्कालीक वा अचानक घडलेली नसून या घटनेची पार्श्वभूमि गेली अनेक दिवसांपूर्वीची आहे. याची इथे माहीती घ्यावीच लागेल.

तीन वर्षापुर्वी क्रिकेट खेळण्याचे कारणातून आहिल्यानगर येथील युवक दिनेश बुरुंगले यांचेवर देखील या बरकडेच्या टोळीतील याच आरोपींनी धारधार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये दिनेश बुरुंगले गंभीर जखमी होवून दवाखान्यात अनेक दिवस उपचार घेत होता. यानंतर पोलीसांचे सहकार्याने आरोपी अटक झाले मात्र काही दिवसांनी जामिनावर बाहेर आले चाहेर आल्यानंतरही हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे युवक विक्रम बरकडेच्या सांगण्यावरून आमचे समाजातील युवकांना दमबाजी करणे एकएकटे गाठुन मारहाण करणे फोनवरून धमकावणे असे प्रकार सर्रास चालू आहेत. शिवाजीनगर मलकापूर येथे भारती विद्यापीठ व आदर्श ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थीनीवर देखील त्यांची वाईट नजर असते, युवतींनी फुस लावणे तसेच शस्रे नाचवत दहशत निर्माण करणे हे वारंवार सुरु असून त्याअनुषंगाने त्यांचेवर मोका सारखी कठोरात कठोर कारवाई ही विनंती.

समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी विक्रम बरकाडे व त्याचे कुटूंबाला सबुराईने घेणेची अनेकदा विनंती केली. मात्र त्याचाही फरक पडला नाही. या उलट बरकडे याचे मटण दुकानात सदर कट रचला गेला आहे व याचे पर्यवसन म्हणून काल आमचेतील युवकावर हल्ला केला गेला. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विक्रम बरकडे व त्याचे इतर साथीदारोबर जिवे मारण्याचे उद्देशाने प्राण करणे, समाजात दहशत निर्माण करणे .खुनाचा कट रचणे. गुन्हेगारी टोळा चालविणे या व अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत ही विनंती.

लोकांनी अन्याय सहन न करता पोलिसांशी संपर्क साधावा : बी. आर. पाटील

मलकापूरमधील हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. मलकापूर येथे युवकावर हल्ला झाला आहे. त्या संदर्भात नागरिकांनी निवेदन दिले आहे. नागरिकांनी रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचा बंदोबस्त व्हावे अशी मागणी केलेली आहे. संशयित वारंवारं दबाव लोकांच्यावर टाकत आलेले आहेत. छोट्या- छोट्या गोष्टीकडे अनेकदा दुर्लक्ष केल्याने काही लोकांच्यात धाडस वाढते, तेव्हा लोकांनी दुर्लक्ष करू नये. तेव्हा आपल्यावरील अन्याय लोकांनी सहन करू नये, पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले आहे.

Leave a Comment