कराडचे उपजिल्हा रूग्णालय अस्वच्छतेच्या विळख्यात : अधिकाऱ्यांच्या केबिन चकाचक तर रूग्णांच्या आरोग्याशी खेळ मांडला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दररोज पहायला मिळत आहे. सध्या कोविडसारख्या महामारीची गंभीर परिस्थिती असताना, कराड उपजिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. रूग्णालयात अधिकाऱ्यांच्या केबिन चकाचक असून सर्वसामान्य रूग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे.

कराडमधील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांचा परिसर एकदम चकाचक ठेवला जात आहे. तर ज्या सर्वसामान्य, गरिब लोकांच्या सुविधेसाठी रूग्णालय आहे. तिथे मात्र अस्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. रूग्णालयात काही दिवसापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपासले होते. त्यानंतर आता हे कर्मचारी हजर झाले आहेत. तरीही अस्वच्छता असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. रूग्णालयातील स्वच्छतेकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसत आहे.

शहरातील स्व. वेणूताई चव्हाण हे उपजिल्हा रूग्णालयात लोकांची उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर येणे- जाणे असते. सरकारी रूग्णालयात कमी खर्चात उपचार उपलब्ध असल्याने गरीब, सामान्य कुटुंबातील लोक येथे येत असतात. परंतु येथे वर्ग 4 मधील कर्मचारी आणि कंत्राटी सफाई कामगार असतानाही अस्वच्छता का असते यांचा शोध आता वरिष्ठ पातळीवरून पाहणे गरजेचे आहे.

सध्या उपजिल्हा रूग्णालयातील या अस्वच्छतेमुळे रूग्ण बरा होण्याऐवजी आजारी पडेल अशीच परिस्थिती दिसून येतेय. रूग्णालय परिसरात ठिकठिकाणी पानमसाले खावून थुंकल्याने रुग्णालयात लाल सडा पडल्याचे दिसते. टॉयलेट दरवाज्यांची मोडतोड झालेली असून कचरा साठल्याचे चित्रही आहे.