कराड तालुका पोलिसांकडून चोरट्यासह 6 दुचाकी जप्त

कराड | दुचाकी चोरट्यास अटक करुन पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या. कराड ग्रामीण पोलिसांनी गुरूवारी ही कारवाई केली. चोरट्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

जावेद दस्तगीर महाबरी (वय-27, रा. आटके, ता. कराड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहरासह ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभुमीवर पोलीस उपअधिक्षक रणजीत पाटील यांनी उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांना या गुन्ह्यांचा गंभीरपणे तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या. कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंदराव खोबरे यांनीही याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचित केले होते.

त्यानुसार नांदगाव दुरक्षेत्राचे उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब तांदळे, हवालदार विकास सपकाळ, ज्ञानदेव राजे, सचिन गुरव, आशिष पाटील हे दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना जावेद महाबरी याचे नाव समोर आले. पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने नारायणवाडी, मलकापूर येथून सहा दुचाकी चोरल्याचे कबुल केले. त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. तसेच त्याला अटकही करण्यात आली. याबाबतची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. हवालदार विकास सपकाळ तपास करीत आहेत.

You might also like