तुम्ही केवळ ब्राह्मणांचे मुख्यमंत्री आहात का? असं भाऊराव पाटील भर सभेत म्हणाले अन वातावरण तापलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कर्मवीर जयंती विशेष । रयत शिक्षण संस्था सुरु करून ज्यांनी बहुजनांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला अशा कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurav Patil) यांची आज १३५ वी जयंती आहे. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले गावात सत्यशोधक समाजाच्या परिषदेत बहुजनांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा ठराव ग्रामस्थांनी केला अन रयतची स्थापना झाली. त्यानंतर कर्मवीर अण्णांनी स्वतःला पूर्णवेळ शैक्षणिक कार्यात ओढून घेतलं. पाहता पाहता रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष महाराष्ट्रभर पसरू लागला. पण अशात १९४८ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांची ग्रँट बंद करण्याचे आदेश काढले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यांनतर असं काय झालं कि तेव्हाचे मुख्यमंत्री बाळासाहेब खैर यांनी रयतची ग्रँट बंद केली तर गृहमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांनी कर्मवीर अण्णांना अटक करण्याचं आदेश दिले? चला तर आज हि गोष्ट थोडक्यात समजून घेऊयात.

Karamveer Bhaurav Patil
कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकत्रित भेटीचा फोटो

ते वर्ष होत १९४८ सालच. नुकताच भारताला स्वातंत्र्य मिळून काही महिने उलटले होते. अन तितक्यात ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींची हत्या झाल्याची घटना घडली. नथुराम गोडसे नावाच्या एका मनुवादी विचारसरणीच्या माथेफिरूने गांधींची हत्या केल्याची बातमी पसरताच गावोगावी ब्राह्मणांचे वाडे जाळले जाऊ लागले. सातारा जिल्ह्यातही जाळपोळ सुरु होती. जिल्ह्याचे तेव्हाचे कलेक्टर हुबळी व डीएसपी नलावडे यांनी भाऊरावांना भेटून त्यांनी लोकांना शांत राहण्याचं आवाहन करण्यासाठी विचारणा केली. भाऊरावही पायाला भिंगरी लावून जिल्ह्याभरात फिरले अन लोकांना शांत करू लागले. याचवेळी, “माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी ब्राह्मणांचे रक्षण करेन’ असे विधान मुख्यमंत्री बाळासाहेब खैर यांनी केल्याची बातमी ज्ञानप्रकाशमध्ये छापून आली. यावर लोक अण्णांना विचारू लागले कि बाळासाहेब इतक्या जिद्दीने ब्राह्मणांचे रक्षण करणार असतील तर तुम्ही कशासाठी इतका त्रास करून घेत आहेत.

Karamveer Bhaurav Patil
कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील आणि रयतेचे विद्यार्थी

१२ फेब्रुवारीला गांधींना जाऊन १३ दिवस झाले होते. भाऊराव कलेक्टरांसोबत सातारा रोडवर भाषण करायला गेले होते. यावेळी भाऊरावांनी तुफान भाषण केलं. भाषणावेळी भाऊरावांनी मुख्यमंत्र्यांच्या मागील वक्तव्यावरून त्यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘बाळासाहेब तुम्ही फक्त ब्राह्मणांचे मुख्यमंत्री आहेत का? संपूर्ण मुंबई इलाख्याचे संरक्षण करणे तुमचे कर्तव्य आहे. तुमचे रक्त हजारो खेडेगावांना पुरणार आहे का? ज्या प्रवृत्तीने महात्मा गांधींची हत्या केली ती प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी तुमचे रक्त खर्च करा असं मनात कर्मवीर अण्णांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली. (Karmaveer Bhaurav Patil)

अण्णांच्या साताऱ्यातील भाषणाची माहिती गृहमंत्री मोरारजी देसाईंना समजली. त्यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता भाऊरावांना अटक करण्याचे आदेश दिले. तसेच, ऊनउने, ठोके, काकडे, साळुंखे यांना संस्थेतून काढून टाका असे मोरारजी देसाईंनी रयत शिक्षण संस्थेला कळवले. यांनतर एक दिवस मोरारजी देसाई यशवंतराव चव्हाणांना घेऊन विमानाने सातारला आले. साताऱ्यात त्यांनी एक मिटिंग घेतली अन त्यात ‘क्या ऐसा आदमी कर्मवीर होता है? क्या वे शिक्षण संस्था चला सकते है? नही. वे बिलकुल बेवकूफ है, नालायक है’ असे मोरारजी म्हणाले. कर्मवीर अण्णांबाबत काढलेले हे शब्द एकूण उपस्थित सगळे एकदम भडकले. शेवटी पोलिसांना मोरारजींनी सुरक्षा देऊन तेथून हलवावं लागलं. (Karmaveer Bhaurav Patil).

मुख्यमंत्री बाळासाहेब खैर आणि गृहमंत्री मोरारजी देसाई

दुसऱ्या दिवशी बेळगावपासून नागपूरपर्यंत सर्व वर्तमान पत्रांत कर्मवीर अण्णांच्या अपमानाची बातमी छापून आली. यांनतर चिडलेल्या मोरारजी देसाई अन मुख्यमंत्री बाळासाहेब खैर यांनी आपल्या अधिकारात रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांची ग्रँट बंद करण्याचा हुकून सोडला. यामुळे संस्थेवर मोठे संकट कोसळले मात्र भाऊराव अजिबात विचलित झाले नाहीत. कारण भाऊरावांना त्यावेळी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. सरकारने ग्रँट जरी बंद केली असली तरी बहुजनांच्या पोरांचे शिक्षण बंद पडणार नाही. माझे सर्व शिक्षक एकवेळ उपाशी झोपतील पण शाळेत जाऊन मुलांना शिकवतील असे अण्णांनी आवाहन करताच शिक्षकांनीही विनावेतन शिकवण्याची तयारी दाखवत आपले काम चालू ठेवले. यावेळी कराड तालुक्यातील कुसूर येथील बंडो गोपाळ कदम उर्फ मुकादम तात्या यांनी स्वतःची १०० एकर जमीन संस्थेला देण्याची घोषणा केली. तसेच कुसूर येथील शाळा स्वखर्चातून चालवण्याचा निर्णय घेतला.

Dansoor Bando Gopala Kadam Mukadam tatya
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमवेत रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दानशूर बंडो गोपाळ मुकादम

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर एखाद्या शेतकऱ्यालाच हिंदुस्थानचा प्रेसिडेंट करावे असे महात्मा गांधी म्हणत होते मग आपण मुकादम सारख्या शेतकऱ्यालाच संस्थेचा अध्यक्ष केला तर काय होईल? असे म्हणत भाऊरावांनी बंडो गोपाळ कदम (मुकादम तात्या) यांना रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केले. सरकारने संस्थेची ग्रॅन्ट बंद केलेली असताना एका शेतकऱ्याने स्वतःची जमिन संस्थेला दिली अन बहुजनांची पोरं शिकवली. त्यानंतर मुकादम तात्यांनी कराड येथे गाडगे महाराजांच्या नावाने सदगुरु गाडगे महाराज कॉलेज सुरु केले. वाठार येथे हायस्कुल काढले. कुसूर येथे डीएड कॉलेज काढले. स्वतःची शेकडो एकर जमीन संस्थेला दान करून कर्मवीर अण्णांच्या कमवा आणि शिका योजनेला सढळ हाताने मदत केली. (Karmaveer Bhaurav Patil)

काही दिवसांनी गाडगे महाराजांनी मुख्यमंत्री बाळासाहेब खैर यांची भेट घेऊन भाऊराव अन सरकार यांच्यातील वाद मिटवला. त्यानंतर संस्थेला पुन्हा सरकारची ग्रँट मिळाली. मात्र कर्मवीर अण्णांनी शैक्षणिक कार्यासोबतच वैचारिक स्तरावरही खूप मोठे प्रबोधन केले. सनातनी विचार धारेला भाऊरावांनी कडाडून विरोध केला. बहुजनांची पोरं शिकवीत यासाठी भाऊरावांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. म्हणूनच लोकांसाठी ते कर्मवीर ठरले

– आदर्श दिपक पाटील
(लेखक दानशूर बंडो गोपाळ मुकादम यांचे पणतू आहेत)