कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दोन दिवस बेळगावात होते. बुधवारी सायंकाळी त्यांना ताप आला होता. त्यावेळी तीन डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचार केले होते.

गुरुवारी सकाळी बेळगावात रोड शोत देखील ते सहभागी झाले होते. पण रोड शो अर्ध्यावर सोडून ते हॉटेलवर परतले. नंतर त्यांनी बंगळुरुला प्रयाण केले. गुरुवारी सकाळी रामय्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी टेस्ट केली. त्यानंतर त्यांना कोरोनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर त्यांना उपचारासाठी मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बेळगावात प्रचाराच्या दरम्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री उमेश कत्ती, जगदीश शेट्टर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या समवेत प्रचाराच्या वेळी होते. भाजप उमेदवार मंगला अंगडी आणि अनेक कार्यकर्ते देखील प्रचाराच्या दरम्यान त्यांच्या संपर्कात होते.

“मला कोरोनाची लागण झाली आहे. माझी तब्ब्येत स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात जे कोणी आले असतील, त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करावं,” असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी केले आहे.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना रविवारी (2 ऑगस्ट) कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर भाजपसह अनेक नेत्यांनी अमित शाह यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा आणि प्रार्थना केल्या आहेत.

“कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्याने मी माझी चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. मी आवाहन करतो, तुमच्यापैकी जो कोणी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आला असेल, त्यांनी कृपया स्वत: विलगीकरणात राहावे आणि आपली चाचणी करुन घ्यावी” असे आवाहन अमित शाह यांनी केले आहे.

Leave a Comment