Friday, June 9, 2023

भाजपचा 30 वर्षाचा बालेकिल्ला ढासळला; कसब्यातील पराभवाची मुख्य कारणे पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे याठिकाणी विजयी झाले आहेत. भाजपच्या हेमंत रासने यांचा तब्बल 11 हजार 40 मतांनी पराभव झाला. तब्बल 28 वर्षांनंतर कसब्यात भाजपचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे हक्काचा मतदारसंघ गमावण्याची वेळ आज भाजपवर आली आहे. अशी कोणती कारणे असू शकतात ज्यामुळे भाजपचा हा गड ढासळला आहे याबाबत आज आपण सविस्तर विश्लेषण करूया….

1) टिळक कुटुंबाबाहेर उमेदवारी –

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठ येथे पोटनिवडणूक लागली. मात्र यावेळी भाजप श्रेष्टींकडून टिळक कुटुंबात उमेदवारी न देता हेमंत रासने यांना देण्यात आली. त्यामुळे सुरुवातीपासून या मतदारसंघातील ब्राह्मण समाज नाराज असल्याची कुरबुर सुरु होती. काही ठिकाणी नाराजीचे फलक सुद्धा लागल्याचे आपण बघितलं होते. या मतदारसंघात ३५ हजार ब्राह्मण मतदार आहेत. सध्याची आकडेवारी पाहिली तर पुण्यातील ज्या पेठांमध्ये भाजपचा वरचष्मा होता तेथेही रवींद्र धंगेकर यांना भरगोस मते मिळाली आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाने मतपेटीतून भाजपविषयीची नाराजी स्पष्टपणे दाखवून दिल्याची चर्चा आहे.

2) धंगेकर यांचं स्थानिक लेव्हल वरील राजकीय वजन

रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास पाहिला तर शिवसेना, मनसे व आता काँग्रेस असा आहे. कायमच जनतेच्या मदतीला धावून जाणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. आत्तापर्यंत त्यांनी सर्व पक्षांमध्ये काम केल्याने सर्वत्र त्यांचे मित्र आहेत त्याचाही त्यांना फायदा झाला. काँग्रेसच्या पारंपरिक मतांबरोबच इतर पक्षातून सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली. अगदी मनसेला तर धंगेकरांना मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी लागली होती. धंगेकर यांचं स्थानिक पातळीवरील वजन पाहता भाजपची सुरुवातीपासूनच मोठी अडचण झाली होती.

3) दुरंगी लढतीचा फायदा महाविकास आघाडीला –

आत्तापर्यंत आपण बघितलं तर कसबा पेठ मध्ये अनेक वेळा तिरंगी लढत झाली आणि याचा फायदा प्रत्येक वेळी भाजपलाच झाला. यंदा मात्र महाविकास आघाडीचे एकीचे बळ दाखवले. महाविकास आघाडीतील तीन पक्षांचा सामना करणे भाजपला अशक्य झालं. महाविकास आघाडीत बंडखोरी न झाल्याने मतविभागणी टळली आहे एकगठ्ठा मते रवींद्र धंगेकर यांच्या पारड्यात पडली. त्यामुळे भाजपचे नुकसान झालं. यानिमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे बंडखोरी न करता महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली तर भाजपचा पराभव करणं नक्कीच अशक्य नाही.

4) सरकार गेल्याने महाविकास आघाडीला सहानभूती

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला ज्याप्रमाणे पायउतार व्हावं लागलं ते पाहता मतदारांमध्ये भाजप बद्दल नाराजी पाहायला मिळत आहे. सध्या शिवसेना विरुद्ध शिंदे गट या वादामध्येही जनतेची सहानभूती उद्धव ठाकरेंच्या प्रति आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या शिक्षक पदवीधर निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे सहानुभूतीची किनार कसबा पेठ पोटनिवडणुकीत सुद्धा पहायला मिळाली.