Breaking!! कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर; कोण झालं विजयी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामधील कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 11 हजाराहून अधिक मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. धंगेकर यांच्या विजयाने भाजपच्या बालेकिल्ल्याला मोठं भगदाड पडलं आहे.

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात मुख्य लढत होती. याठिकाणी रवींद्र धंगेकर यांना 72599 मते मिळाली तर पराभूत उमेदवार हेमंत रासने यांना 61771 मते पडली. 11 हजार 40 मतांनी रवींद्र धंगेकर यांचा दमदार विजय झाला आहे. कसबा पेठ हा भाजपचा बाल्लेकिल्ला मानला जातो, मात्र मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसचे धंगेकर हे आघाडीवर दिसत होते. त्यांनी आपली ही आघाडी शेवट्पर्यंत राखत विजय संपादन केला.

गेल्या अनेक वर्षांपासून कसबा पेठ येथे भाजपचा आमदार आहे. त्यामुळे या पोटनिवडणूकीत भाजप नेत्यांची प्रतिष्टा पणाला लागली होती. भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूच्या नेत्यांनी याठिकाणी प्रचार सभा आणि रॅलीने संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढला होता. मात्र याठिकाणी पराभवाचा सामना करावा लागल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. या निवडणुकीपूर्वी ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यामुळे भाजपचं गणित नेमकं कुठं फसलं याचा शोध आता पक्षाला घ्यावा लागेल.