खंडोबाची यात्रा रद्द : महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या “या” गावात संचारबंदीचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उंब्रज | महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबाची शनिवार दि. 15 जानेवारी रोजी होणारी यात्रा जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली. दरम्यान, खंडोबाचे सर्व धार्मिक विधी, रुढी, परंपरा या स्थानिक पातळीवर खंडोबाचे प्रमुख मानकरी, कारखान्याचे मानकरी अशा फक्त 50 जणांच्या उपस्थितीत होणार आहेत. याबाबत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी आदेश काढला आहे.

पाल येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा 15 जानेवारी हा मुख्य दिवस आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा रद्दचा निर्णय बैठकीत जाहीर करण्यात आला. या बैठकीस खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड होते. सुरेश पाटील, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच सुनील काळभोर, मंडल अधिकारी युवराज काटे, धनवडे, यात्रा कमिटीचे चेअरमन प्रकाश जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

संपुर्ण यात्रा कालावधीत सासन काठ्या, मानकरी, पालख्या, बैलगाड्या यांना मनाई करण्यात आली आहे. तसेच सर्व दुकाने, स्टाॅल, खेळणी यांनाही मनाई करण्यात आली आहे. सर्व भाविकांना दर्शनासाठी देवस्थान मार्फत ऑनलाईन सोय करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत पाल यात्रा अनुषंगाने पाल गावाकडे जाणाऱ्या रोडवरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला असुन काशिळ-पाल- तारळे रोड, उंब्रज-वडगाव-पाल रोड, हरपळवाडी- पाल रोड, मरळी- पाल रोड वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे.

या बैठकीस देवस्थानचे संचालक संजय काळभोर, सर्जेराव खंडाईत, तंटामुक्तीचे संजय गोरे, मंगेश कुंभार, जगन्नाथ पालकर, उत्तम गोरे, सचिन लवंदे, महेश पाटील, संजय गोरे, दिनकरराव खंडाईत, हरीष पाटील आदी उपस्थित होते.

पाच किलोमीटर अंतर परिसरात संचारबंदी : अजय गोरड

दि. 14 ते 19 जानेवारी अखेर व 23 जानेवारी रोजी श्री खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दि. 14 जानेवारीपासून पाच किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घ्यावी तसेच यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे.

Leave a Comment