सातारा | खिंडवाडी येथे 17 नोव्हेंबर तारखेला झालेला अमोल डोंगरे या तरुणाचा खून हा नरबळी असल्याचे अनेक पुरावे समोर येत आहेत. त्या आधारे पोलिसांनी या घटनेमध्ये नरबळीच्या शक्यतेचा कसून तपास करावा आणि पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा, असे निवेदन सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाला देण्यात आले आहे.
यावेळी डॉ. हमीद दाभोलकर प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, हौसेराव धुमाळ, वंदना माने, शंकर कणसे यांनी अंनिस मार्फत दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अमोल डोंगरे यांचे बंधू भागवत डोंगरे (रा. कोठरबन, ता. वडवणी जि. बीड) यांनी महाराष्ट्र अनिसला संपर्क करून दिलेल्या तक्रार अर्जाच्यानुसार अंनिस कार्यकर्त्यांनी या विषयी सखोल चौकशी केली असता असे समोर आले आहे, कि मधुकर सोनावणे हा खून प्रकरणात सापडलेला आरोपी स्वतः मांत्रिक म्हणून कोठरबन (ता. वडवणी जि. बीड) येथे कार्यरत होता. त्याच्याकडे दैवी शक्ती असून तो तंत्र मंत्र विद्या जाणतो असे तो म्हणत असे आणि लोकांना भूत उतरवणे, खजिना शोधणे अशा गोष्टींच्यासाठी मदत करण्याचे दावे करून फसवत असे अशी माहिती समोर आली आहे. मुळचे बीड कोठरबनचे रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जावळे आणि केशव वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी मधुकर सोनावणे हा त्या गावात गेले काही महिने समुद्रातील सोने काढून देतो असे सांगून लोकांची फसवणूक करीत होता.
त्यायोगे एखाद्या व्यक्तीला मोहात पडून त्याला बळी देण्याचे त्याचे मनसुबे होते असा संशय गावात व्यक्त केला जात आहे. अशी कोणती व्यक्ती सहजी न भेटल्यामुळे अमोल डोंगरे याचे ट्रान्सपोर्ट व्यवसायातील सहकारी सुनील रखमाजी डोंगरे यांना सोबत घेवून मनोहर सोनावणे यांनी अमोल डोंगरे याच्या खुनाचे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात देखील त्यांनी याची वाच्यता केली आहे. तसेच अमोल डोंगरे याचा खून केल्याने आपण आता अमर झालो. अमोल डोंगरे माझ्या राशीला आला होता, म्हणून त्याला ठार मारले अशी विधाने संशयित आरोपी कडून केली गेली आहेत.
तसेच खुनाच्या नंतर अमोल डोंगरे यांच्या मृत देहाच्या पायाला बिबा बांधून त्याला लिंब खिंडी जवळच्या खाणीत टाकण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अमोल डोंगरे खून प्रकरणात नरबळीच्या शक्यतेचा विचार करून पोलीस दलाने कसून चौकशी करावी आणि संशयित आरोपींना जादूटोणा विरोधी कायद्याची कलमे देखील लावावीत अशी मागणी म अंनिस मार्फत करण्यात आली आहे.