सैन्यात भरती करतो म्हणून फसवणूक करणाऱ्या युवकाचे अपहरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सैन्यात भरती करतो असे सांगून आर्थिक फसवणूक केल्याने व घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्यानेच संशयतांनी उंडाळे येथील युवकाला कारमधून पळवून नेले होते. आपले घेतलेले पैसे परत मिळावेत हा संशयतांचा मुख्य उद्देश होता. मात्र त्यांनी चुकीच्या मार्गाचा अवलंब करत कायदा हातात घेतल्याने अपहरणाचा प्रकार घडला असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न होत असल्याचे पोलिसांनी दिली.

उंडाळे येथील अमित चव्हाण याचे रविवारी अपहरण झाले होते. कराड तालुका पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेत तपासाची सुत्रे हलवली. दरम्यान मंगळवारी पहाटे तीन वाजता छापा टाकून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून अमित चव्हाण याची सुटका करत दहाजणांना अटक केली होती. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत गतीने तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या तपासातून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

दरम्यान याप्रकरणाचा तपास करताना सैन्य भरतीसाठी पैसे घेऊन फसवणूक केल्याने हे अपहरण झाल्याचे उघड होत आहे. अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या संशयितांपैकी तिघांचे सैन्यभरती करतो असे सांगून उंडाळेतील युवकाने पैसे घेतले होते. मात्र सैन्यभरतीसाठी टाळाटाळ होऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संशयितांनी अमित चव्हाण याच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र त्यालाही टोलवल्याने त्यांनी युवकाचे अपहरण करण्याचा प्लॅन केला असल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट होत आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक दीपज्योती पाटील करत आहेत.