किनी टोलनाक्यावर पोलिसांवर गोळीबार, कोल्हापूरात भितीचे वातावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर कोल्हापूर येथील किनीटोलनाका येथे आज गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. कोल्हापूर पोलीस आणि राजस्थान येथील २५ गुन्ह्यांत आवश्यक असलेले तीन आरोपी यांच्यात फायरींग झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेमुळे किनीटोलनाका आणि परिसरात काहीकाळ भितीचे वातावरण पसरले होते.

हाती आलेल्या माहितीनुसार, राजस्थान येथील २५ गुन्ह्यांत आवश्यक असलेले तीन मोठे आरोपी कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असल्याची माहिती राजस्थान पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांना दिली होती. त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील किनी टोलनाक्यावर सापळा रचला. सदर तीन आरोपी पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट डिझायर गाडीतून येत असल्याची टीप पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार तशी संशयित गाडी टोलनाक्यावर येताच पोलिसांनी तिला आडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीतील आरोपींनी गाडी पोलीसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी टोलनाक्यावरील संरक्षित कठड्याला धडकली. यानंतर गाडीत असलेल्या शामलाल पुनिया या मुख्य आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. यामुळे पोलिसांनीही गोळीबार केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे किनी टोलनाक्यावर एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, या घटनेमध्ये मुख्य आरोपी शामलाल पुनिया याच्या पायाला गोळी लागली असल्याची माहिती पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे. पुनिया याला कोल्हापूर येथील शासकिय रुग्नालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.

Leave a Comment