सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कोरेगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. कोरेगाव नगरपंचायत, कोरेगाव भाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच चुरशीने झाली. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव ग्राम सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक चुरशीने होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर सोसायटीच्या 13 जागांसाठी 31 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनपेक्षितपणे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे, उदयसिंह बर्गे, राजेंद्र बर्गे, गुलाबराव बर्गे, संतोष बर्गे आदींनी केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे 13 जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज उरल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये सर्वसाधारण गटातून विठ्ठल रामचंद्र काटे, शिवलिंग विठ्ठल बर्गे, हिंदुराव दादू नांदे, नारायण रामचंद्र बर्गे, संजय प्रल्हाद बर्गे, सयाजी शिवाजीराव बर्गे, शरद विठ्ठल बर्गे, अनिल चंद्रकांत बर्गे, महिला राखीव मतदारसंघातून मालन बाळासाहेब महाडिक, सुमन धर्मराज बर्गे, इतर मागास प्रवर्गातून तानाजी लक्ष्मण नाळे, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रामचंद्र अप्पासाहेब बोतालजी, विशेष मागास प्रवर्गातून सचिन हणमंत कोकरे या 13 जणांचा समावेश आहे.