कोयना धरण : आज 10 हजार क्युसेस पाणी नदीपात्रात सोडणार, दरवाजे दुसऱ्यांदा उचलणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या पाटण तालुक्यातील कोयना धरणात चालू वर्षी पावसाचा जोर वाढलेला असून विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. धरण क्षेत्रात आज दि. 12 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 103. 19 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे धरणातून आज रविवारी दुपारी 2 वाजता धरणांची वक्र दरवाजे 1 फुटांनी उचलून 10 हजार क्युसेस पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.

कोयना धरणाची पाणी पातळी 2161 फूट 11 इंच झाली असून धरणामध्ये 103. 19 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक अपेक्षित आहे. पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. कोयना धरणात गेल्या महिन्यात जोरदार अतिवृष्टी झालेली असल्याने धरणक्षेत्रात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. त्यानंतर काही दिवस पावसाचे प्रमाण कमी झाले होते.

यंदा 23 जुलै रोजी सकाळी 8 वाजता वक्र दरवाजे पहिल्यांदा उचलण्यात आले होते. या काळात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सकाळी 10 हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले होते, मात्र अति पावसामुळे दिवसभरात वक्र दरवाजातून 50 हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले होते. कोयना दरवाजे तब्बल 13 दिवसांनी 4 आॅगस्ट रोजी बंद करण्यात आले. आता कोयना धरणाने शंभरी पार केल्याने पुन्हा दुसऱ्यांदा वक्र दरवाजे उचलण्यात येणार आहेत.

Leave a Comment