मोफत साखर देणारा कृष्णा कारखाना देशात एकमेव : डॉ. सुरेश भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून गावागावांत जाऊन बैठका, कोपरा सभा घेत जोरदार प्रचार केला जात आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीनेही सध्या प्रचार केला जात असून य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनीही नुकत्याच कराड तालुक्यातील अंबवडे, कोळे व आणे येथे जाऊन प्रचारसभा घेतल्या. यावेळी त्यांनी मोफत साखर देणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना हा देशातील एकमेव असा कारखाना असल्याचे प्रतिपादन केले.

कराड तालुक्यातील अंबवडे, कोळे व आणे येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या नुकत्याच प्रचारसभा घेण्यात आल्या. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, उमेदवार सयाजी यादव, बबनराव शिंदे, माजी संचालक श्रीरंग देसाई, अजित खबाले, हेमंत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.

यावेळी डॉ. सुरेश भोसले म्हणाले, “निवडणुकीत सहकार पॅनेलने सभासदांना प्रतिशेअर दरवर्षी ६० किलो साखर देण्याचे आश्वासन दिले होते. हे मोफत साखरेचे अभिवचन आमच्या संचालक मंडळाने पूर्ण केले आहे. गेल्या सहा वर्षात आम्ही शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिला आहे. सरासरी हा दर ३ हजार रुपये इतका आहे. आम्ही पारदर्शक व नियोजनबद्ध असा कारभार केला. कृष्णा कारखाना एक कुटुंब आहे, या विचाराने काम आम्ही केले. येत्या काळातही कृष्णा कारखाना शेतकरी सभासद हिताचे अनेक उपक्रम राबविणार आहे. तसेच कारखान्याची गाळप क्षमता ९००० मेट्रीक टनावरून १२,००० मेट्रिक टन वाढविण्याचा आमचा मानस आहे. जयवंत आदर्श योजना अधिकाधिक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे.”

यावेळी श्रीरंग देसाई म्हणाले, “कृष्णा कारखान्याची निवडणूक ही आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे. या संस्थेचे आपल्याला दैनंदिन जीवनात मोठे सहकार्य लाभते. या भागाचा सर्वांगीण विकास कृष्णा कारखान्यामुळे व भोसले कुटुंबामुळे झाला आहे. त्यामुळे या भागातील आम्ही सर्व सभासदांनी सहकार पॅनेलला मोठे मताधिक्य देण्याचा निर्णय घेतला आहे.”

Leave a Comment