Tuesday, February 7, 2023

कराडकरांसाठी गुड न्यूज! आता कृष्णेतच होणार कोरोना चाचणी; रिपोर्टसाठी पुण्याची गरज नाही

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विश्वविद्यालय, कराड यांना कोविड-19 चाचणीसाठी ऑल इंडिया इन्सिट्यूट मेडिकल सायन्सेस, यांच्याकडून मान्यता मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामुळे आता सातारा जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांना कोरोना चाचणीच्या अहवालासाठी पुण्याला जाण्याची आवश्यकता लागणार नाही आहे.

- Advertisement -

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करुन ही साखळी तोडणे अधिक महत्वाचे असते, त्या दृष्टीने कराड मध्ये चाचणीला मान्यता मिळणे हे जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहे. येत्या काही दिवसात इथेच चाचण्या होतील, त्यामुळे पुण्याला जाण्याचा तिथे गेल्यानंतरची थोडी प्रतिक्षा हा वेळेचा अपव्यय टाळता येईल आणि लवकरात लवकर अहवाल आपल्या हाती येईल, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत असताना कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विश्वविद्यालयाला कोरोना चाचणीचे निदान करण्याची परवानगी मिळणे फायद्याचे ठरणार आहे. यामुळे कोरोनाचा अहवाल प्राप्त होण्यास दिरंगाई होणार नसल्याने बाधित रुग्णांवर उपचार करणे जास्त सोईचे होणार आहे.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५२ वर पोहोचली आहे. यामध्ये एकट्या कराड तालुक्यात ४२ कोरोना रुग्ण आहेत. आज सकाळी उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील ६ आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.