सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सतत पडणाऱ्या अतिवृष्टीचा फटका हा सातारा जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील गावांना बसला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कोंढावळे येथील देवरुखवाडीत गुरुवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भूस्खलनाची घटना घडली असून यात पाच घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहे. परिसरातील नागरिकांनी 27 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले असून अजूनही 2 महिला बेपत्ताच आहेत. अजूनही या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास वाई तालुक्यातील कोंढावळे येथील देवरुखवाडी मध्ये अतिवृष्टीने भूस्खलन झाले. अचानक झालेल्या भूस्खलनामुळे वाडीतील 5 घरे पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्या खाली दबली गेली. या घटनेनंतर इतर नागरिकांनी जी घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली. त्यातून त्यांना बाहेर काढले. मात्र, अजूनही 2 महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आहेत.
ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. रात्री मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पावसाच्या जोरामुळे हि रेस्क्यू मोहीम थांबवण्यात आलेली होती. आता शुक्रवारी सकाळपासून पुन्हा रेस्क्यू मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून न सापडलेल्या महिलांना शोधण्याचे काम सुरू आहे. या भूस्खलनाच्या घटनेत सुमारे 20 ते 25 जनावरांचा जीव गेला आहे.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच आमदार मकरंद पाटील, तहसीलदार रणजीत भोसले, पश्चिम भागातील नेते बापूसाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे सर्व प्रशासन आरोग्य व्यवस्था रुग्ण वाहिका या ठिकाणी पोहोचले आहेत. जेसीबीच्या माध्यमातून युद्धपातळीवर दरड बाजूला हटविण्याचे काम सध्या सुरू आहे. दरडी खालून काढलेल्यातील तीन लोक अत्यवस्थ असून त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. हा भाग दुर्गम असल्यामुळे आणि या मार्गावरील रस्ते व पूल मुसळधार पावसात वाहून गेल्यामुळे जागेवर पोहोचण्यात व मदत कार्यात अडचणी येत आहेत.