शहरातील 17 ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारीविरोधात सर्वात मोठे कोम्बिंग ऑपरेशन ! तलवारी, अवैध दारू जप्त

औरंगाबाद – औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील 17 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संशयित आणि अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध 2 आणि 3 ऑक्टोबर रोजी 30 तास कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईत दारू विक्रेते, जुगारी शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात आले. आतापर्यंतचे शहरातील हे सर्वात मोठे कोम्बिंग ऑपरेशन ठरले. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक ठेवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या ऑपरेशनला चांगलेच यश मिळाल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहन चोरी, घरफोडी, खून, मंगळसूत्र, मोबाइल, रोख रक्कम हिसकावणे, नागरिकांची लूटमार यासारखे गंभीर गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे विविध वसाहतींमधील नागरिक त्रस्त आहेत. ही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी दुपासी चार ते 3 ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पोलिसांच्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यात अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यात संशयित इमान अमजद खान, तेजेंद्र सिंग नथासिंग ग्रंथी, शेख अमन शेख सलीम, शाम किसन साबळे, सय्यद मुजाहेद सय्यद युसूफ, सचिन गणेश बोडखे, राहुल साळवे, विठ्टठ ऊर्फ भावड्या नजन, ज्ञानेश्वर शेळके तसेच हद्दपार गुन्हेगार मंगेश भालेराव यांना पकडण्यात आले.

सातारा परिसरातील योगेश शिंदे याच्या घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी रविवारी दुपारी शिंदे यांच्या घरावर छापा मारला. तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना घरात जाण्यास विरोध केला. मात्र झाडाझडती घेतली तेव्हा तेथे विविध कंपन्यांचा पावणेतीन हजारांचा गुटखा सापडला. गणेश संजय डाखोळे, गणेश सुधाकर कवडे, शेख मोहसीन शेख खैरू या तिघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी तलवारी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दोन दिवस चालवलेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये देशी दारूच्या साठ्यांवरही छापा टाकण्यात आला. शहरातून अनेक वाहानांसह देशी दारूचा एक लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

You might also like