‘त्या’ वक्तव्यावरून राहुल गांधींचे मोदींवर शरसंधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी। हाउडी मोदी कार्यक्रमात मोदी यांनी दिलेल्या अब की बार ट्रम्प सरकार घोषणेवरून नाराजी व्यक्त होत आहे. त्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्टीकरणही दिले. याच घटनेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांचे आभार मानत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे. “आपल्या पंतप्रधानांच्या अकार्यक्षमतेवर पडदा टाकल्याबद्दल जयशंकर यांचे आभार. परराष्ट्रमंत्री असेपर्यंत तुम्ही पंतप्रधानांना थोडासा मुत्सद्दीपणा शिकवा,”असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे.

मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ह्युस्टनमध्ये हाउडी मोदी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी फिर एक बार ट्रम्प सरकार अशी घोषणा दिली होती. मोदींच्या या वक्तव्यावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “अमेरिकेतील स्थानिक राजकारणाविषयी भारताची भूमिका तटस्थ आहे. पंतप्रधान मोदी हे भूतकाळातील घोषणेविषयी बोलले. त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे,” असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते.

जयशंकर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटर वरून जयशंकर यांचे आभार मानत मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “जयशंकरजी, आपल्या पंतप्रधानांची अक्षमता लपवल्याबद्दल आभार. मोदींमुळे भारताच्या लोकशाहीसाठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मला आशा आहे की, तुमच्या हस्तक्षेपामुळे हे बदलेलं. जोपर्यंत आपण परराष्ट्रमंत्री म्हणून कार्यरत आहात. तोपर्यंत पंतप्रधानांना थोडासा मुत्सद्दीपणा शिकवा,” असे परराष्ट्र मंत्र्यांना आवाहन करत राहुल यांनी मोदींना टोला लगावला आहे.

 

Leave a Comment