विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २९९ निवडणूक निरीक्षक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई, वृत्तसंस्था । विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत २९९ निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय उमेदवारांची नामनिर्देशने दाखल करण्यापासून ते निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देखरेख ठेवण्यासाठी १३८ सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून हे सर्व आय.ए.एस (इंडियन ॲडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिस) दर्जाचे अधिकारी आहेत.

प्रत्येकी २ किंवा ३ विधानसभा मतदारसंघासाठी १ सर्वसाधारण निरीक्षक काम बघतील. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. निवडणूक कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण राखण्याच्या दृष्टीने आय.पी.एस. (इंडियन पोलीस सर्व्हिस) दर्जाचे ४१ पोलीस निवडणूक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने हे निरीक्षक महत्त्वाची भूमिका बजावतील. प्रत्येक पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त कार्यक्षेत्राला १ याप्रमाणे निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उमेदवार आणि पक्षांच्या निवडणूकविषयक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आय.आर.एस. (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) दर्जाचे ११२ खर्चविषयक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. प्रत्येकी २ किंवा ३ विधानसभा मतदारसंघासाठी हे निरीक्षक काम बघतील. निवडणुकीतील अवैध खर्च रोखण्याच्या दृष्टीने यांची भूमिका महत्त्वाची ठरते. याशिवाय आयोगाकडून राज्यस्तरावर अशा २ विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिव्यांगांसाठी निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी निवडणूक आयोग वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहे. त्या अनुषंगाने ६ विभागीय आयुक्तांना सुलभ निरीक्षक (Accessible Observer) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी मतदान कालावधीत सोयी-सुविधा उपलब्ध करणे, त्यांची मतदार नोंदणी तसेच प्रत्यक्ष मतदान वाढविणे यासाठी करण्यात येणाऱ्या कामांवर संनियंत्रण ठेवण्यासाठी हे सुलभ निरीक्षक काम करणार आहेत.


Leave a Comment