‘मी पण सावरकर’ म्हणत भाजपा आमदार विधीमंडळात आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी | नागपूर येथे सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आमदारांनी ‘मी पण सावरकर’ असलेल्या टोप्या घालून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपानं यावेळी केली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजपानं आक्रमक भूमिका घेतली आहे . राहुल गांधींनी हे सांगून बरं केलं की ते सावरकर नाहीत. पण या देशातील प्रत्येकाला स्वत:चे नाव सावरकरांसोबत जोडून घेतल तर ते भाग्य असेल. काँग्रेस वाल्यांना स्वत:चं नाव सावरकरांसोबत जोडून घ्यायला लाज वाटत असेल तर आम्हाला ‘मी पण सावरकर’ लिहीलेल्या टोप्या घालताना अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदारांनी दिली आहे .

यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा भाजपा आमदारांनी धिक्कार केला. राहुल गांधी, सोनिया गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपा आमदारांनी घोषणाबाजी केली.

दरम्यान गेल्या चार दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना भारतात मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया सुरु असल्याचे म्हटले होते. त्यावरून भाजपाने राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी लोकसभेत केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर दिल्लीतील एका सभेत राहुल गांधी यांनी “माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. सत्य बोललो, त्यासाठी माफी मागणार नाही. मरेन मात्र माफी मागणार नाही,” असे वक्तव्य केले. त्यामुळे सर्वच स्तरातून राहुल गांधींवर टीका होत आहेत.

Leave a Comment