लष्करप्रमुखांनी आम्हाला राजकारण शिकवू नये – पी. चिदंबरम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तिरुवनंतपुरम | देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून अनेकांमध्ये मतभेद आहेत. या कायद्यावरून राजकीय स्टंटबाजीदेखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातच लष्करप्रमुखांनी या कायद्याविरोधात आंदोलन कर्त्यांना निशाणा केले. या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांना सुनावले आहे.

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये. त्यांनी स्वत:च्या कामात लक्ष द्यावे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी केली. ते शनिवारी तिरुवनंतपुरम येथील सभेत बोलत होते. बिपीन रावत यांनी नुकतेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्यांना लक्ष्य केले होते. आपण सध्या शहरांमध्ये विद्यापीठ, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांची हिंसक आंदोलने पाहत आहोत. पण लोकांना चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे नेते चांगले नसतात, अशी टिप्पणी त्यांनी केली होती.

आजच्या सभेत पी.चिदंबरम यांनी लष्करप्रमुखांच्या या वक्तव्याला उत्तर दिले आहे. पी चिदंबरम भाषणात म्हणाले, आजकाल लष्करप्रमुख सरकारला पाठिंबा देण्याची भाषा बोलत आहेत. ही शरमेची बाब आहे. माझे लष्करप्रमुख रावत यांना इतकेच सांगणे आहे की, तुम्ही लष्कराचे नेतृत्व करता, त्याच कामाकडे लक्ष द्यावे. आम्ही तुम्हाला युद्ध कसे लढावे, हे सांगत नाही. त्याचप्रमाणे राजकारण्यांनी काय करायला पाहिजे, हे आम्हाला सांगणे लष्कराचे काम नव्हे. तुम्ही तुमच्या रणनीतीप्रमाणे युद्ध लढता. तसेच आम्ही देशाचे राजकारण चालवतो, असे पी.चिदंबरम म्हणाले.

Leave a Comment