Saturday, June 3, 2023

लातूरमध्ये गळा आवळून सुनेने केला सासूचा खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलघडा

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुनेनं आपल्या सासूचा खून केला आहे. धक्कादायक म्हणजे सुनेने आपल्या मुलाला हाताशी धरून सासूचा खून केला आहे. यामुळे गैरकृत्य करण्याला विरोध करणाऱ्या सासूला आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सुनेने आणि नातवाने गळा आवळून ही हत्या केली आहे. या प्रकरणी निलंगा पोलिसांनी सून आणि नातवाला अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण
हि घटना लातूर जिल्ह्यामधील निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा या गावामध्ये घडली आहे. यामध्ये रुक्मिणबाई राजाराम माने यांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुक्मिणबाई यांचा मुलगा शिवाजी याला आपल्या आईचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा संशय आला. तेव्हा त्याने आपली पत्नी ललिता आणि मुलगा गणेश यांच्यावर संशय व्यक्त केला. शिवाजी हा शासकीय नोकरीला आहे. मात्र त्याची पत्नी त्याच्यापासून फारकत घेऊन बाजूलाच राहते. मात्र शिवाजी आपल्या आईबरोबर राहत होता. पत्नी वेगळी राहत असल्याने शिवाजी आपल्या पत्नीला पोटगी देतो. मात्र पोटगी मिळत असतानाही पत्नी ललिताने त्याच्या घरावर कब्जा केला होता.

मृत महिलेचा मुलगा शिवाजी हा दिवसभर कामावर असायचा. त्यावेळी पत्नी ललिता गैरकृत्य करायची आणि याच गैरकृत्यांना सासू रुक्मिणबाई विरोध करत होती. याचाच राग मनात धरून ललिताने आपला मुलगा गणेशला हाताशी घेतले आणि रुक्मिणबाई यांचा गळा आवळून खून केला. यानंतर सकाळी रुक्मिणबाई मृतवस्थेत घरात सापडल्या होत्या. रात्री व्यवस्थित असणाऱ्या आपल्या आईला काय झाले,असा प्रश्न शिवाजीला पडला होता. तेव्हा आपल्या आईचा खून झाल्याचा संशय शिवाजीला आला.तेव्हा त्याने निलंगा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली. यानंतर मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हा अनैसर्गिक मृत्यू असल्याचे स्पष्ट झाले. मृत महिलेच्या मुलाने व्यक्त केलेल्या संशयामुळे पोलिसांनी शिवाजीची पत्नी ललिता आणि मुलगा गणेश यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.