हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे आज दुःखद निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फणसवाडी येथिल राहत्या घरी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
गेल्या काही दिवसापांसून सुलोचना चव्हाण यांची प्रकृती खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज शनिवार 10 डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज ३ वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.
असे झाले गायनाच्या क्षेत्रात पदार्पण-
मुंबईतील एका चाळीत सुलोचना चव्हाण यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्या गायला लागल्या. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता “श्रीकृष्ण बाळमेळा”. याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केलेल्या आहेत. त्यांची मोठी बहीण स्वतः कलाक्षेत्रात नव्हती, पण सुलोचना चव्हाणांना नेहमी प्रोत्साहन देत असे. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. असे असले तरी, सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नाही. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या. त्याकाळात परिस्थितीशी झगडून त्यांनी गाण्याची कला आत्मसात केली आणि त्यामुळेच त्यांची ही कला चिरकालीन टिकावी अशी निर्माण झाली.
सुलोचना चव्हाण यांना मिळालेले पुरस्कार –
– शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा २००९ सालचा राम कदम कलागौरव पुरस्कार
– महाराष्ट्र सरकारचा ’मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनाकरिता १९६५ सालचा पुरस्कार
– संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०१०चा “लता मंगेशकर” पुरस्कार
– चिंचवडच्या रोटरी क्लबतर्फे जीवनगौरव पुरस्कार (१७-१-२०१५)