चचेगाव परिसरात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील चचेगाव येथील एका वस्तीवर बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. चचेगाव येथील लोकवस्तीत काल बिबट्याने रात्रीच्यावेळी येऊन एका कुत्र्यावर हल्ला केला आहे. त्याच्या हल्ल्याची द्रुश्य सीसीटीव्ह कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. बिबट्याकडून रात्रीच्यावेळी केल्या जात असलेल्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चचेगाव आणि परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे मागील काही महिन्यापासून येथील रहिवाशांकडून सांगितले जात आहे. मात्र, अद्यापही वनविभागाला मोकाटपणे फिरणाऱ्या बिबट्याला पकडण्यास यश आलेले नाही. रात्रीच्यावेळी बिबट्याचा गाव परिसरात वावर होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. बिबट्याच्या भीतीमुळे अनेकांनी आपल्या घरातील लहान मुलांना परगावी नातेवाईकांकडे पाठवले आहे.

काल रात्रीच्यावेळी चचेगावात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडिओही सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यानाही दिली आहे. तालुक्यातील मलकापूर, जखिणवाडी, चचेगाव, विंग, धोंडेवाडी परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने महिलांसह शेतकऱ्यांनाही शेत शिवरात जाण्याची भीती वाटत आहे.

You might also like