लाॅकडाउन : आता तरी पुरुषांनी पुरुषीपणा सोडून घरात स्त्रियांना मदत करायला हवी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विचार तर कराल | मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वजण घरामध्ये बंद आहेत. अशा परिस्थितीत घरात आणि घरातील असंख्य गोष्टीत पुरुषांचा सहभाग वाढला आहे. मात्र घरकामात असणाऱ्या बाईच्या कामात मात्र सहभाग जाणवत नाहीये. (काही अपवाद असू शकतील) स्त्रियांचा जन्म मुळातच घरकाम आणि त्यामधील अदृश श्रम करण्यासाठीच झालेला आहे का? अगदी लहानपणापासूनच मुलामुलींमध्ये बिंबवलं जातं की घरकाम हे स्त्रियांचे क्षेत्र आहे. घरात कोणी पुरुषाने घरकामात हातभार लावला तर कौतुक आणि आनंद व्यक्त केला जातो मात्र स्त्री ते काम रात्रंदिवस करत असते याकडे समाज दुर्लक्ष करतो.

घरकाम आपल्याला करावचं लागत हेच स्त्रीच्या मनी उतरवलं असल्यामुळे त्या निमूटपणे घरकामात स्वतःला झोकून देत आल्या आहेत. स्त्रिया नोकरी करत असल्या तरी कामावरून परत आल्यावर घरातील कामं परत तिलाच करावी लागतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्त्रियांना कामच काम वाढून ठेवले असते. घराच्या साफसफाईपासून ते प्रत्येकाचा चहा, नाष्टा, जेवणाची तयारी, कपडे व भांडे धुणे या सर्व कामापासून बाईला सुटका अजिबातच नाही. कोरोनामुळे अनेक जणांनी कामवाल्या स्त्रियांना कामावरन कमी केलंय त्यामुळे तर स्त्रियांच्या घरकामात अजून भर पडली आहे. या कामात पुरुष तिला मदत करताना दिसत नाहीयेत.

कोरोनाच्या निमिताने पुन्हा एकदा मला माझ्या घरामध्ये किती कामे असतात हे लक्षात आले आणि प्रत्यक्ष मीही तो अनुभव घेतला. आज जरी शिक्षणाचे प्रमाण स्त्रियांचे वाढले, स्त्रियांचा सार्वजनिक क्षेत्रातील सहभाग वाढला आणि घरकामात वाढता पुरुषांचा सहभाग हा दिसत असला तरी याच प्रमाण अत्यंत कमी आहे. तसेच घरकामाच्या उदात्तीकरणाच्या व त्यातील पुरुषांच्या सहभागाच्या उदात्तीकरणाच्या ज्या पोस्ट समाज माध्यमांवर येत आहेत त्यातून एक आभास निर्माण होऊ शकतो की, जणूकाही लिंगभेद आणि घरकाम हा विषय आजच्या काळात हद्दपार झालेला आहे. त्यामुळे हा विषय ‘घिसापिटा’ ठरवला जाण्याची शक्यता आहे. परंतु या ‘बदलांकडे’ आजच्या बदलेल्या परिस्थितीत अतिशय चिकित्सकपणे पाहणं गरजेच आहे. हा मुद्दा स्त्रिया विरुद्ध पुरुष इतक्यापुरता सीमित नाही तर घरकाम ही जात, वर्ग, लिंगभाव यांच्या गुंतागुंतीच्या संबंधांच एक महत्वाचे क्षेत्र आहे.

जे कुटुंबातील स्त्रीच्या विनामोबदला श्रमावर आणि तथाकथित कनिष्ठ जात-वर्गातील कामगार स्त्रीच्या श्रमावर उभे आहे. थोडक्यात आजही मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्या माणूसपणाचा हक्क मान्य केला जात नाहीये. घरदारातील दररोज होणारी कौटुंबिक हिंसा आणि श्रामाच्या संपत्तीचे विषम वाटप हे आजही मोठ्या प्रमाणात दिसून येते. यातूनच कोणतीही आपत्ती आल्यास स्त्रियांनाच त्याची सर्वप्रथम व मोठी किंमत चुकवावी लागते. कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थितीही याला अपवाद नाही. कोरोनाच्या निमित्ताने सर्वांनी घरकामातील विषम श्रम विभाजन समजून घेत, लिंगभाव विषमता आणि स्त्रियांचं आरोग्य यांचा सहसंबंध समजून घेत आपल्या कुटुंबातील श्रम वाटून घेऊन समतेवर आधारित हिंसामुक्त कुटुंब तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकावे हीच सदिच्छा.

स्नेहा चामले
95796 88188
(एम. ए . समाजशास्त्र, स्वा.रा.ती.म. विद्यापीठ उपकेंद्र, लातूर)

Leave a Comment