लग्नाच्या आधी आत्महत्या ?? पण का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 दुनियादारी | माधवी काकडे

लग्नाच्या 15 दिवस आधी आत्महत्या करावी असं कोणाला वाटेल बरं ? कोणालाच नाही वाटणार. मग औरंगाबादमधील एम.डी झालेल्या डॉक्टर तरुणीला असं का वाटलं असावं ? तिचं प्रेमप्रकरण होतं का? तिला कशाचा त्रास होता का? हा प्रश्न सगळयांना पडला असेल. पण या आणि अशा अनेक घटनांच्या मागे असणाऱ्या खऱ्या कारणांचा शोध आपण कधीतरी घेणार आहोत का?

WhatsApp Image 2020-02-26 at 7.14.03 PM

आई-वडिलांनी या तरुणीच्या मनाविरुद्ध लग्न करण्याचा विचार केला असेल आणि तिला स्पष्टपणे विरोध करण्यात अडचण आली असेल तर? किंवा तिला मुलाकडून असणाऱ्या अपेक्षा होत नसतील तर..? किंवा आणखी काय बरं वेगळं कारण असू शकेल? मुलगी शिकली, प्रगती झाली म्हणत आज प्रत्येक मुलीला शिक्षणाचा आणि स्वतःचा नोकरी, व्यवसाय निवडायचा अधिकार तर आई-वडील आता देतच आहेत. मात्र जोडीदार निवडीच्या बाबतीत मुलीच्या मनाचा विचार केला जातोय का? तिने स्वतःला आवडणारा जोडीदार निवडल्यानंतर त्याच्याशीच लग्न करण्याचा हट्ट केला तर आम्ही तुला यासाठीच शिकवलं का ? असले उद्योग करशील असं वाटलं नव्हतं, घरातील लहान भावंडांवर काय संस्कार होणारेत याचा जरा तरी विचार करायचा, तू आमच्या मनाविरुद्ध लग्न केलं तर आम्ही आत्महत्या करू, नाहीतर तुला जीवे मारू, पेटवून देवू, तुझ्या प्रियकराची हत्या करू आणि हेही नाहीच जमलं तू आमच्यासाठी मेली अशा धमक्याही मुलीला दिल्या जातात. ही बाब फक्त जातीमधील जोडीदार निवडीची आहे बरं का? जातीबाहेर म्हटलं तर प्रश्न आणखीनच भयानक होतो.

मुलीला आईवडिलांची काळजीच नसते हा विचार याठिकाणी करणंच मुळात चुकीचं आहे. मुलीला आई-बाप आणि नातेवाईक मुळी गमवायचे नसतात. त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्यात तिला का नाही आनंद वाटणार? इतकं शिकल्यावर स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर तिला स्वतःच आयुष्य स्वतःच खराब करावं असं का बरं वाटेल? आपल्यासाठी काय आणि कोण चांगलं इतकी समज तर तिला आलेलीच असते. मात्र तरीही तिला जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य दिल जात नाही. दिलंच तर जातीचा बग असं बजावून सांगितलं जातं. मुळात प्रेम ही जात, धर्म बघून करायची गोष्टच नव्हे हे सत्य स्वीकारायलाही आज समाजाला का जड जातंय??

तुला शिकवून चूक झाली, तू आमच्यासाठी कलंक आहेस, तू जर तुला आवडणाऱ्या मुलाशी लग्न केलं तर आम्ही आत्महत्या करू…! या धमकीमुळेच अनेक मुलींनी आईवडिलांऐवजी आत्महत्येचं लोढनं स्वतःच्याच गळ्यात अडकवलेलं आहे.

अशा घटनांना आई-वडील आणि नातेवाईक जबाबदार असतात असं नाही. मात्र समाज आणि जात नसलेली जात ही नक्कीच जबाबदार आहे. आई-वडील हे समाजाला आणि फुटाफुटावर बसलेल्या जातीच्या रक्षकांना घाबरतात. मात्र हा समाज आपल्या आनंदातही नसतो आणि दुःखातही ही गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे. समाजाच्या आणि जातीच्या भीतीला बळी पडल्यामुळे ही जात आणि समाज आई-वडिलांना हिंसक बनवतो. त्यातूनच शिरीन सारख्या उच्चशिक्षित तरुणींना आत्महत्येसारखं कठोर पाऊल उचलाव लागत हे दुर्दैव…!!

Leave a Comment