आकर्षणाच्या भिंतीपल्याड…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

– विभावरी विजया नकाते –

प्रेम ही एक खूप महत्वाची भावना आहे, जी प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यात, वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या स्वरूपात येते व परिणाम करते. खरं तर ‘भावना’ म्हणजे काय असा जर विचार केला तर,भावना म्हणजे मनामध्ये आलेले उत्कट विचार किंवा भावना म्हणजे मानसिक जाणीवा, संवेदना अशा व्याख्या आपल्याला मिळतील.भावना सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्हीपैकी काहीही असू शकतात. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे भावना ही अमूर्त कल्पना असली तरी त्याचे परिणाम मात्र मूर्त असतात.तसंच आहे प्रेमाचंही. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम हे असतंच; पण ते अमूर्त, त्याचे परिणाम मात्र आपल्याला स्पष्टपणे जाणवतात.

अन्न, वस्त्र आणि निवारा अशा काही मूलभूत गरजांसोबतच मानवाला आयुष्यात प्रेमाची गरज असतेच. प्रेमविरहित आयुष्य माणूस कसा जगू शकेल? अर्थात हे प्रेम वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला त्या त्या वयाच्या भावनिक व मानसिक गरजेनुसार भेटत असतं. लहानपणी हवं असणारं प्रेम हे कुटुंबातून भेटतं आणि तेव्हा ते पुरेसं असतं. पण जसं जसं माणूस वयाच्या पुढच्या टप्प्यांकडे जायला लागतो तसं तसं त्याला हवं असणारं प्रेम हे अजून विविध स्वरूपाचं असतं जर फक्त कुटुंबातून मिळणाऱ्या प्रेमाने पूर्ण होत नाही.

खरं तर वयात येईपर्यंत मुलामुलींना ‘प्रेम’ हा शब्द फारसा माहीतच नसतो. तो शब्द पिक्चरमधून वगैरे ऐकला असला तरी हा काय प्रकार आहे ते समजत नसतं. पण वयात आल्यानंतर अशा शब्दांबद्दलसुद्धा कुठंतरी आकर्षण वाटायला लागतं. वयात येण्याचं मूळ उद्दिष्ट म्हणजे मुलीचं रूपांतर स्त्रीमध्ये आणि मुलाचं रूपांतर पुरुषामध्ये होण्याची प्रक्रिया जी पूर्णतः नैसर्गिक आहे. पण याच प्रक्रियेत शारीरिक बदलांसोबतच मानसिक व भावनिक बदलसुद्धा होत असतात. वयात आल्यानंतर लिंगभावनेच्या निर्मितीला सुरुवात होते आणि त्याच्यासोबत भिन्नलिंग आकर्षणाला सुरुवात होते. बहुतांश वेळा आकर्षण हे शारीरिक घटकांवर आधारलेलं असतं. पण आकर्षण आणि प्रेम यातला फरकच माहीत नसल्याने आकर्षण म्हणजेच प्रेम असा समज होतो आणि पुढे प्रेमाची व्याख्याच बदलून जाते. प्रेम आणि आकर्षण यातला फरक समजावून घेताना आपण असं म्हणू शकतो की इन्स्टंट असतं ते आकर्षण आणि नातं खुलायला वेळ देऊन जे निर्माण होतं ते प्रेम. म्हणजे “पहली नजर में ऐसा जादू हो गया” असं जे म्हणलं जातं ती जादू म्हणजे प्रेम नसून आकर्षण असतं. आकर्षण हे तात्पुरतं असतं. ‘आज हिच्या प्रेमात पडलो तर उद्या तिच्या…’ यातला प्रेम हा शब्द किती चुकीचा आहे ; हे इथं जाणवायला लागतं.कारण आकर्षण हे काही काळानंतर कमी होत जातं, पण प्रेम जे सहवासातून निर्माण होतं, ते मात्र जास्त काळ टिकणारं असतं. आकर्षण हे बाह्य गोष्टींवर आधारित असतं तर प्रेम हे विचार, स्वभाव, व्यक्तिमत्व यांवर आधारित असतं. आकर्षणात फक्त सकारात्मक गोष्टी महत्वाच्या ठरतात कारण त्या ठराविक सकारात्मक गोष्टी पाहूनच आपण एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होतो. मात्र प्रेमात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींसह एकमेकांना स्वीकारणं महत्वाचं असतं. हे सगळं जरी असलं तरी प्रेमाची सुरुवात आकर्षणातून होते, हे सुद्धा तितकंच खरं….!!!

मग आकर्षणापासून सुरू झालेला हा प्रवास पुढं प्रेमापर्यंत पोहचतो, आकर्षण ते प्रेम व्हाया मैत्री या मार्गाने. आकर्षणामुळे जेव्हा एकमेकांच्या ओळखी होतात, संवाद होतो, सहवास वाढू लागतो तेव्हा छान मैत्रीचं नातं निर्माण होतं. याच वयात खोल मैत्रीची गरज सुद्धा असते. Adult वयात मैत्री करताना आपल्याला समज असते. कारण स्वभाववरून, आवडी- निवडीवरून या वयात मैत्री जुळते आणि हीच मैत्री दीर्घकाळ टिकू शकते. Mutual Understanding हा मुद्दा सुद्धा या नात्यात महत्वाचा ठरू लागतो. विचार करण्याचा धागा, कॉमन इंटरेस्ट या गोष्टी तपासल्या जातात आणि असा बराच वेळ गेल्यानंतर, खऱ्या अर्थानं माणसं एकमेकांना समजायला लागल्यानंतर, आयुष्यातल्या पुढच्या वाटा ठरतात. या सगळया प्रवासानंतर ठरू शकतं की ते फक्त आकर्षण आहे की प्रेम आहे. अर्थात हा प्रवास व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येकच जण प्रेमाच्या स्टॉपपर्यंत असाच प्रवास करत पोहचेल असं नाही. पण तरी हा प्रवास आकर्षण, मैत्री आणि प्रेम या तीन शब्दांबद्दल मनामध्ये माजलेला गोंधळ थोडासा कमी नक्कीच करतो.

तूर्तास सर्व प्रेमवीरांना प्रेमपूर्ण सदिच्छा

Leave a Comment