करोनामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे राज्यभरात होणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवणीवर गेल्या आहे. पुढील आदेश येईपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचं परिपत्रक निवडणूक आयोगाकडून काढण्यात आलं आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्याची घोषणा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना मदान म्हणाले, “राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचा १० ऑगस्ट २००५ रोजीच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्‌भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम सध्याच्या टप्प्यांवर स्थगित केले आहेत,” अशी माहिती मदान यांनी दिली.

राज्यातील १९ जिल्ह्यांतील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी ३१ मार्च रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता मतदर याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. वसई- विरार महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, वाडी, राजगुरूनगर, भडगाव, वरणगाव, केज, भोकर आणि मोवाड या नऊ नगरपरिषदा, नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्या; तसेच सुमारे १२ हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात कार्यवाही सुरू होती. या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही मदान यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या देशात करोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सरकारकडूनही करोनाला रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत ३९ बाधित रुग्ण सापडले आहेत. मुंबईसह आसपासच्या परिसरात रुग्णांची संख्या १४ वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारची काळजी घेतली जात आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment