महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे ढग

परराज्यातील कामगारांची गावी परतण्यासाठी धडपड

औरंगाबाद : राज्यातील कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणा-या संख्येमुळे ठाकरे सरकार महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास गेल्यावर्षीसारखी वाईट परिस्थिती ओढावू शकते, या भीतीने औरंगाबादेत वास्तव्याला असणा-या परराज्यातील कामगारांची गावी परतण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

देशभरातून अनेक मजूर रोजीरोटीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये वास्तव्य करुन आहेत. यापैकी बहुतांश जण असंघटित क्षेत्र किंवा रोजंदारीवर काम करणारे आहेत. लॉकडाऊन झाल्यास सगळे दैनंदिन व्यवहार ठप्प होतील. त्यामुळे या कामगारांची उपासमार होऊ शकते. परिणामी हे सर्व मजूर आणि कामगार सध्या प्रसारमाध्यमांमधील प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून आहेत.

ठाकरे सरकारने अद्याप लॉकडाऊनचा ठोस निर्णय घेतलेला नाही. मात्र आम्हाला गेल्यावेळीप्रमाणे पुन्हा स्वत:ची फरफट होऊन द्यायची नाही, असे परराज्यातील कामगारांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी २४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर लांबपल्ल्याच्या गाड्या आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी हातावर पोट असलेल्या मजुरांनी हजारो मैल दूर असणा-या आपल्या गावी पायी चालत जाण्याचा मार्ग पत्करला होता. यामध्ये अनेक मजुरांचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनचे ढग दाटू लागल्याने हे कामगार सावध झाले आहेत.

लॉकडाऊन करायचा झाल्यास सरकारने आम्हाला किमान दोन-तीन दिवस अगोदर सूचना द्यावी. जेणेकरून आम्ही येथे अडकून पडण्यापेक्षा आमच्या गावी जाऊ, असे अनेक कामगारांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ असल्याचे जाणून त्यामुळे अनेक लहान कंपन्यांमधील कामगारांनी गावी परतायला सुरुवात केली आहे, रेल्वेस्थानक परिसरात या कामगारांनी आपापल्या घरी जाण्यासाठी गर्दी केल्या असल्याचे दिसून आले.

You might also like