Lockdown । मराठी- अमराठी, महाराष्ट्रीयन- परप्रांतीय वाद-विवाद आणि भूमिका…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अख्या जगाला कोरोनाच्या विळख्याने अगदी हैराण करून सोडले आहे, सर्व जगाला आणि मानवाला या कोरोनाने अंतर्मुख करायला लावलंय एवढं मात्र नक्की, त्यातून भारतासारखा विकसनशील देश सुटणार तरी कसा..!
काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साईट्स वर महाराष्ट्र द्वेष , गुजरात प्रेम , बिहार-उत्तरप्रदेश प्रेम , परप्रांतीय , मराठी अशा विविध विषयांवर अनेक पोस्ट ह्या फिरत आहेत, त्यातूनचं हा लेख लिहिण्याचा प्रपंच..!

खरं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रांतांची पुनर्रचना करताना भाषा , प्रशासकीय सोय , संस्कृती या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आणि राजकीय घटक म्हणून राज्यांना काही भौतिक रेषा आखण्यात आल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टी ठेवून भारतीय संविधानातचं कलम १९ (५)(६) नुसार देशातल्या प्रत्येक नागरिकाला भारतात  कुठेही राहण्याचा , स्थायिक होण्याचा आणि व्यवसाय स्वातंत्र्याचा अधिकार दिला.

महाराष्ट्र हे भारतातल्या इतर राज्याच्या तुलनेत मानाने प्रगतशील राज्य असल्याने आणि मुंबई ही इंग्रजांच्या काळापासूनचं एक वैभवशाली शहर असल्याने साहजिकच उत्तरप्रदेश , बिहार अशा विकसनशील राज्यातील बेरोजगार तरुण मजूर म्हणून पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात मुंबईकडे येऊ लागले. बरं इथे आल्यानंतर ते खूप आरामदायी आयुष्य जगत आहेत असंही नाही , मिळेल ते काम करणं , इथे झोपडपट्टीत राहून निम्नस्तरीय आयुष्य जगून ते आपल्या पोटाची खळगी भरताना आपण पाहतो. ह्या ‘सो कॉल्ड’ परप्रांतीय मजुरांना नावं ठेवताना किंवा हाकलून द्यायच्या गप्पा करताना यातील किती कामे आपले मराठी तरुण करू शकतील…? ते ही तितक्या कमी मोबदल्यात , हा ही विचार नावं ठेवताना नक्कीचं करायला हवा.

मराठी मालक सुध्दा जास्तीत जास्त यूपी-बिहारी लोकांनाचं कामावर का ठेवतात…? हा साधा विचार आपल्याकडून होत नाही. अहो , आपल्यातले बहुसंख्य तरुण तर आपण राज घराण्यात जन्म घेतलाय आणि हे असलं खालच्या दर्जाचं काम मी कसं आणि का करू , याचं अविर्भावात जीवन जगत असतात.

बरं परप्रांतात व्यवसायानिमित्त , शिक्षणासाठी जाणारे मराठी तरुण पण काही कमी नाहीत. माझे कित्येक मित्र आज बंगलोरच्या आयटी सेक्टर कंपनीत, तर कित्येक जण UPSC च्या क्लासेस साठी  व अभ्यासासाठी दिल्लीत राहत आहेत, तर काही इतर व्यावसायिक कामाच्या निमित्ताने कर्नाटक , मध्यप्रदेश , तेलंगणा राज्यात स्थायिक झालेले आहेत..ते ही तिथे परप्रांतीय आहेतचं की..!

आपल्यातला प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्यातल्या राज्यात का होईना स्थलांतरित आहेच की. मी स्वतः श्रीरामपूरचा असून शिक्षणासाठी पुण्यात आणि नोकरी निमित्ताने आज मुंबईत राहतो.
‘वसूधैव कुटुंबकम्’ असा संदेश जगाला देणारे आपण, भारतातल्याचं अन्य राज्यातल्या बांधवांना हाकलून द्यायच्या गप्पा मारताना सोयीस्कर रित्या हे सगळं विसरून जातो. असंच चालू राहीलं तर उद्या मुंबई , पुण्यातल्या स्थानिक लोकांनी आपल्यासारखे लोकं हे पर जिल्ह्यातील , पर तालुक्यातील आहेत म्हणून द्वेष केल्यास राग मानून घेऊ नका..पुढे जाऊन हा अहमदनगर चा , ती उस्मानाबाद ची असा विचार आपण करणार आहोत काय..??


सत्य परिस्थिती वर आधारित ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये दाखवल्याप्रमाणे “तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या आम्ही तुम्हाला खाणारच ना” तसंच “तुम्ही आमच्या नोकऱ्या खाल्ल्या आम्ही तुम्हाला खाणारचं ना” अशी वेळ येऊ नये..

काही परप्रांतीय व्यक्ती ( म्हणजे गुन्हेगारी वृत्तीचे फक्त) समाज विघातक कृत्ये करतात हे मान्य. पण महाराष्ट्रात असे मराठी व्यक्ती नाहीतचं असं कोणी म्हणू शकतं का. आपल्या आजू बाजूचे सगळे मराठी लोकं खूपचं चांगले आहेत काय…त्यांच्यात काहीचं वादविवाद नाहीत काय…आपल्या राज्यात गुन्हेगारी नाही का…?? साध्या ग्रामपंचायत निवडणुकीत भावकी मध्ये काठ्या , तलवारी , कोयत्याने मारामाऱ्या होताना मी पाहिलंय..

यूपी , बिहार मधून आलेले मजूर आपल्याला नकोत पण आपण मात्र दिल्लीत , चेन्नईत , हैद्राबाद , बंगलोरमध्ये नोकरी – व्यवसाय निमित्ताने स्थायिक झालेलं आपल्याला चालतं.. अमेरिकेच्या नासामध्ये (NASA) जवळपास २९% भारतीय आहेत , हे आम्ही मोठ्या अभिमानाने  सांगणार , हे कोणते विचार..

महाराष्ट्राच्या विकासात रतनजी टाटा , अंबानी बंधू , अजीज प्रेमजी सारखे व्यवसायिक आणि अक्षय कुमार , अमिताभ बच्चन यांसारख्या परराज्यातील सिनेतारक यांचं काहीच योगदान नाही काय. संकटाच्या काळात या व्यक्तींनी भरभरून दान केल्याचं आपण नेहमीचं पाहत नाही काय..??

देशाच्या पंतप्रधान पदावरील व्यक्ती आज गुजरात ची आहे , या आधी पंतप्रधान पदावरील व्यक्ती आसाम मधून राज्यसभेवर निवडून आलेली होती आणि सर्वांत जास्त वेळा तर या पदावरील व्यक्ती उत्तरप्रदेश राज्यातीलचं होती आणि प्रत्येक वेळेस ती कोणत्या तरी एकाचं राज्यातील असू शकते , म्हणून इतर राज्यातील व्यक्तींनी त्यांना गुजराती व्यक्ती पंतप्रधान , पंजाबी व्यक्ती पंतप्रधान असंचं म्हणायचं का…?? व्यक्ती द्वेष करता करता आपण किती हीन पातळीवर जाणार आहोत , याचाही विचार व्हायला हवा.

नाशिक जिल्ह्यातील धरणांतील सोडलेलं पाणी अहमदनगर जिल्ह्याला हवं असतं त्यासाठी आमच्याकडे अहमदनगर जिल्ह्यात उपोषणे केली जातात पण तेच पाणी पुढे औरंगाबाद जिल्ह्यातील माणसांची , मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातुन सोडायची वेळ आली की, आम्ही नको तितका विरोध करणार , किती हा विरोधाभास…!
         
काही दिवसांनी लॉकडाउन ही संपेल आणि सगळं काही पहिल्या सारखं सुरळीत चालू होईल. आपल्यातले कित्येक जण पुन्हा आपआपल्या कामावर चेन्नई , हैद्राबाद , बंगलोर दिल्लीला जातील. तसेच परराज्यातील मजूर देखील पुन्हा इथे कामावर येतील, तेव्हा त्यांना प्रेमाने सामावून घ्यावं. प्रतिज्ञेत लिहिल्या प्रमाणे “सारे भारतीय माझे बांधव आहेत” हे कृतीतून दाखवून द्यावं, एवढंचं मला वाटतं , बस्स..!

डॉ.कमलेश जऱ्हाड ( लेखक हे मंत्रालय मुंबई येथे स. कक्ष अधिकारी आहेत).

Leave a Comment