औरंगाबाद | लॉककडाऊनमुळे सर्वत्र कामधंदा बंद नैराश्याचं वातावरण निर्माण झाला आहे. गतवर्षीपासून अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. यावर्षीही पुन्हा लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन मध्ये गृह कर्ज कसे फेडायचे या चिंतेने ग्रासलेल्या कर्जदार तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हर्सूल परिसरातील किर्तीनगरात सोमवारी सकाळी उघडकीस आली.
राजेंद्र बंडू वाघ वय (31) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, वाघ हे शहरातील इलेक्ट्रॉनिक दुकानात सेल्समन होते. फायनान्स कंपनी कडून कर्ज घेऊन त्यांनी कीर्तीनगर येथे घर बांधले.
सुरुवातीचे दोन हप्ते भरले मात्र करुणा महामारी च्या काळात त्यांचे काम आणि पगार दोन्ही थांबले. सर्वकाही पूर्ववत होईल या आशेवर मागचे एक वर्ष गेले. या वर्षी पुन्हा एकदा कोरोनाने कहर घातला आणि महिनाभरापासून कडक लॉकडाउन लागू झाले. गृहकर्ज वेळेवर न भरल्यास बँक आपल्या घराचा लिलाव करू शकते अशी भीती त्यांना सतावत होती.
या भीतीपोटी रविवारी रात्री त्यांची पत्नी पाच वर्षाचा मुलगा आणि एक वर्षाच्या मुलांसह दुसर्या खोलीत झोपली असता राजेंद्र यांनी छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेतला आणि जीवनयात्रा संपवली. पहाटे पाच वाजता झोपेतून उठलेल्या त्यांच्या पत्नीने रूम मध्ये जाऊन पाहिले असता तिच्या रडण्याने शेजारी व नातेवाईक धावत आले. राजेंद्र यांना घाटीत नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. हर्सूल ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार डी.आर. करीत आहेत.
ना चिट्ठी, ना बँकेची नोटीस
पोलिसांनी सांगितले की राजेंद्र यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी वगैरे काहीही लिहिलेले नाही. वरील सर्व माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली शिवाय अर्जदार बँकेने त्यांना कर्जफेडीसाठी काही नोटीसही बजावली नव्हती.