हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशासहित राज्यामध्ये देखील करोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात 1 मे नंतर लॉक डाऊन वाढणार का? याबद्दल राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले. राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील लॉक डाऊन बाबत निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. दरम्यान उद्या बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. राज्यात मोफत लसीकरण केले जाणार की नाही यावर देखील कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “सर्वांसाठी मोफत लसीकरणावर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील मी विनामूल्य लसींच्या प्रस्तावावर सही केली आहे. मुख्यमंत्री लोकांच्या हिताचा निर्णय घेतील. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही लसींच्या खरेदीच्या जागतिक निविदेच्या मुद्द्यावर चर्चा करू” असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
१ मे नंतर ही लॉक डाऊन लागणार का ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारण्यात आला त्यावर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे. आता ऑक्सिजन बेड , वेंटिलेटरची परिस्थिती पाहून लॉक डाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात येईल असे संकेतही पाटील यांनी दिले आहेत.