हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या वर्षी १५ डिसेंबर २०१९ पासून शाहीन बाग येथे शांततापूर्ण वातावरणात सीएए आणि एनआरसीच्या विरोधात दिल्लीच्या महिलांचे धरणे आंदोलन सुरु आहे. शाहीन बाग आंदोलनाची दखल देशभरातच नव्हे तर जगभरात घेतली जात आहे. महिलांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग या आंदोलनात सहभागी झाला आहे. हा तरुणवर्ग ज्यात विद्याथ्यांची संख्या जास्त आहे येथील महिलांसोबत आंदोलनांत निरनिराळ्या कल्पक गोष्टींमधून सीएएला विरोध दर्शवत आहे. पथनाट्य, नाटक, सभा आणि भाषणांच्या माध्यमातून येथील महिला, तरुणवर्ग सीएए आणि एनआरसीला विरोध करत आहेत.
शाहीन बागेत सुरु असलेल्या आंदोलनात महिलांच्या बरोबरीने देशभरातून आलेला तरुणवर्ग तितक्याच निडरतेने आणि सक्षमपणे आपलं म्हणणं येथे उभा राहत मांडत आहे. दरम्यान, विविध माध्यमातील वृत्तांनुसार, आंदोलनाची ज्योत पेटवणाऱ्या या तरुणांमध्ये आता प्रेमही फुलू लागलं आहे. अनेक प्रेमकहाण्यांचा जन्म या आंदोलनात झाला आहे. प्रचंड तणाव आणि आक्रोशपुर्ण वातावरणात प्रेमाचे अंकुर फुटणं ही बाबच कमालीची आहे. येथे सुरु झालेल्या प्रेमातून अनेकांच्या रेशीमगाठी जुळल्या आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या तरुणांच्या पालकांनी त्यांच्या प्रेमाला पाठिंबा सुद्धा दिला आहे. या आंदोलनात दोन जोडप्यांना एकमेकांवर प्रेम जडलं आणि येत्या ७ आणि ८ फेब्रुवारीला ते लग्नही करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही तरुण तरुणींची घरची मंडळी एकमेकांना ओळखतात. मात्र, आंदोलनादरम्यान त्यांच्यामध्ये परस्परांबाबत विश्वास निर्माण झाला. जीशान-आयशा हे ८ फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध होत आहेत. या दोघांचे कुटुंबीय आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. मात्र, या तरुणांनी कधी लग्नाबाबत विचार केला नव्हता. या आंदोलनादरम्यान दोघांमध्ये चर्चा सुरु झाली त्यानंतर त्यांच्यात हळूहळू प्रेमाचा रंग चढायला लागला. आंदोलनादरम्यानच जीशान याने आयशाला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी देखील या लग्नाला परवानगी दिली.
तर दुसरी जोडी म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेणारे एक युगुल जुनैद आणि समर ७ फेब्रुवारी रोजी निकाह करणार आहेत. या दोघांमध्ये आंदोलनादरम्यान चर्चा सुरु झाली ज्याचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. याची माहिती त्यांनी आपापल्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर कुटुंबियांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर निकाह करणार आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.