LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; पहा नव्या किंमती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली असून सर्वसामान्य माणसाचे जगणं मुश्किल झालं आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असतानाच आता LPG गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. मात्र ही दरवाढ घरगुती गॅससाठी नसून व्यावसायिक गॅस सिलिंडर साठी आहे.

मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात 104 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या दरानुसार आता व्यवसायिक सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 2,355 रुपयांवर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे मागील महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात 268 रुपये वाढ करण्यात आली होती.

तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मुंबईत विना अनुदानीत गॅस सिलिंडरची किंमत 949.50 रुपये आहे. तर चेन्नईत 965.50  रुपये इतकी आहे. तर लखनौ आणि पाटण्यात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत अनुक्रमे 987.50 रुपये आणि 1039 रुपये इतकी आहे.