LPG Cylinder Price: आजपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 266 रुपयांनी वाढ, आता काय दर चालू आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या दरानंतर आता सर्वसामान्यांना एलपीजी सिलेंडरचाही मोठा फटका बसला आहे. एलपीजी कमर्शिअल सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आजपासून व्यावसायिक सिलेंडर 266 रुपयांनी महागले आहेत. दिल्लीत आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2000.50 रुपये होईल, जी पूर्वी 1734 रुपये होती. घरगुती एलपीजी सिलेंडरची दरवाढ नाही.

या वाढीनंतर दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2000 रुपयांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी ते 1,733 रुपयांना विकले जात होते. मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर जो 1,683 रुपयांना विकला जात होता, तो आजच्या दरवाढीनंतर आता 1,950 रुपयांवर गेला आहे. कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 2,073.50 रुपये झाली आहे आणि चेन्नईमध्ये या उत्पादनाची किंमत 2,133 रुपये झाली आहे.

घरगुती वापरासाठी कोणताही बदल नाही
घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 14.2 किलोचा एलपीजी सिलेंडर विना सबसिडी 899.50 रुपयांना विकला जात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 6 ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. कोलकातामध्ये 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 926 रुपये आहे तर चेन्नईमध्ये त्याची किंमत 915.50 रुपये आहे.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती लवकरच 1,000 रुपयांचा टप्पा ओलांडतील अशी अपेक्षा आहे. या वर्षी आतापर्यंत घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती जानेवारीत 694 रुपयांवरून 899.50 रुपयांपर्यंत वाढल्या असून त्यात सलग आठ वेळा वाढ झाली आहे.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या
भारतातील एलपीजी सिलेंडरच्या किमती निर्धारित करणारे दोन मुख्य घटक म्हणजे जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलर-रुपया विनिमय दर कारण कच्च्या तेलाच्या किमती अमेरिकन डॉलरमध्ये निर्धारित केल्या जातात. ब्रेंट क्रूडच्या किमती आता प्रति बॅरल 84 डॉलरच्या जवळ ट्रेड करत आहेत, तर शुक्रवारी डॉलर-रुपया विनिमय दर 74.88 अंकांवर बंद झाला, ज्यामुळे एलपीजीच्या किमतींवर दबाव आला.सध्याच्या नियमांनुसार, कुटुंबांना अनुदानित दरात प्रत्येकी 14.2 किलोचे 12 सिलिंडर मिळण्यास पात्र आहेत. यापेक्षा जास्त असलेली कोणतीही मात्रा बाजारभावाने किंवा विनाअनुदानित दराने खरेदी करावी लागेल.

You might also like