व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आ. गोरे आणि रामराजेंचे पुतणामावशीचे प्रेम : शेखर गोरे

सातारा | दुष्काळी माण तालुक्यासाठी वरदान ठरणारी बंगळूर-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत म्हसवड एमआयडीसी प्रस्तावित आहे. मात्र काही राजकारण्यांनी स्वार्थापोटी ही एमआयडीसी कोरेगावला नेण्याचा घाट घातला होता. मात्र माणच्या सामान्य जनतेला बरोबर घेऊन त्यांचा हा डाव आपण कदापी यशस्वी होवू देणार नाही. रामराजे नाईक- निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांचे पुतणामावशीचे प्रेम सर्व जिल्ह्याला माहित आहे. दोघांनीही माणच्या एमआयडीसी बाबतची नौटंकी बंद करावी. माणची एमआयडीसी कुठेही जाणार नाही. ती इथेच होईल यासाठी माणची जनता आणि मी समर्थ आहे, असा इशारा शिवसेनेचे युवा नेते शेखरभाऊ गोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

शेखरभाऊ गोरे म्हणाले, रामराजे व आ. गोरे यांची एमआयडीसीवरून चाललेली शाब्दीक टोलेबाजी जिल्हा बँकेप्रमाणे सोयीची राहणार आहे. त्यांना जनतेचे काहीही देणे घेणे नाही. एकाला कायम खुर्ची हवी तर दुसऱ्याला दिव्याचे स्वप्न पडलेले आहे. दोघांचीही स्वप्ने पूर्ण व्हावीत, यासाठी आमच्या शुभेच्छा राहतील. पण राजकीय फायद्यासाठी एकत्र येणाऱ्यांनी जनतेच्या भावनांशी खेळू नये. तुमच्या स्वार्थासाठी माणच्या जनतेच्या स्वप्नाशी खेळाल तर याद राखा. कट्टर शत्रु असल्याचे दाखवत हेच दोघेजण जिल्हा बँक निवडणुकीत आपल्याविरोधात एकत्र लढले होते. ज्या स्व. पोळतात्यांना जिंकून आणण्यासाठी मी प्रयत्न केले त्याच पोळतात्यांच्या मुलाला माझ्याविरोधात रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली उभे केले गेले. बँकेत पूर्ण पॅनेल माघारी घेत आमदार गोरेंनी त्यांना साथ दिली. हे सर्व राज्याने पाहिले आहे. या निवडणुकीत दोघेही एकत्र आले होते. तरीही नियतीने आपल्या बाजूने कौल दिला होता. त्या निवडणुकीप्रसंगी आपण दोघांनाही भेटून दोघांचे पारंपारिक राजकीय वैरत्वाची आठवण करून देत मला मदत करता येत नसेल तर तटस्थ रहावे, असे आवाहन केले होते. परंतु दोघांनीही राजकीय वैर विसरून हातमिळवणी करत माझ्याविरोधात काम केले. आता हेच दोघे एमआयडीसी वरुन एकमेकाविरोधात टिका करत जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे हे दोघेजण कधी एकत्र येतील आणि एकमेकांना कधी विरोध करतील याची खात्री नाही. त्यांचे पुतणामावशीचे प्रेम जनतेने ओळखले आहे.

शेखरभाऊ गोरे म्हणाले, आम्हाला मोक्का लावला होता तरी आम्ही कोणाच्या पुढे झुकलो नाही आणि कधी झुकणारही नाही. सोयीनुसार व वेळेनुसार राजकीय तडजोडी करणारी आमची औलाद नाही. ईडीच्या भीतीने काहींनी एमआयडीसीच्या बाबतीत बघ्याची भूमिका घेतली होती. राजकीय पदे व सत्ता मिळवण्यासाठी हे दोघेजण काहीही करायला बसले आहेत. ते जनतेचा कळवळा दाखवून एमआयडीसीबाबत राजकीय तह करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. परंतु त्यांच्या मनात असले काही असेल तर त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी माणची जनता व आपण खंबीर असल्याचेही शेखरभाऊ गोरे यांनी म्हटले आहे.