कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणाऱ्या होर्डिंगमुळे खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून विरोधकांवर कडाडून हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने गनिमी कावा करीत मुख्यमंत्री आणि जनादेश यात्रेवर पोस्टरबाजीतून निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री फडणवीस ज्या मार्गाने रॅली काढणार आहेत त्या मार्गावरील प्रमुख चौकात राष्ट्रवादीने रातोरात फडणवीस यांच्या विरोधात फलक उभारले आहेत. रात्री उशिरा फलक लावण्यात आले. पण हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी पहाटे ते काढण्याची कार्यवाही केली. त्यामुळे ही पोस्टररबाजी अर्ध्या रात्रीचीच ठरली.

दरम्यान, काल (सोमवारी) सांगली जिल्ह्यात फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान कडकनाथ कोंबड्या आणि बांगड्या फेकण्याचा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक येथे यात्रेच्या फलकावरील मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या प्रतिमांना काळे फासण्याचा प्रकार घडला होता. आज कोल्हापूरमध्ये कडकनाथ कोंबडी, टोल आंदोलन, मराठा-धनगर आरक्षण, आशा कर्मचाऱ्यांचे 10 दिवस सुरू असणाऱ्या आंदोलनाचे पडसाद उमटू नयेत आणि यात्रेत अडथळा येऊ नये यासाठी पोलीस व प्रशासन सज्ज झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सोमवारी रात्री कोल्हापूरमध्ये पोहोचली आहे. त्यावेळी यात्रेच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने कोल्हापूर मध्यरात्री शहरात फलक लावण्यात आले होते. यामध्ये कांदा आयात, गडकोट किल्ले, शेतकऱ्यांची कर्जमाफी, कडकनाथ घोटाळा, वाचाळवीर भाजप नेते याबाबत खिल्ली उडवणारा मजकूर प्रसिद्ध केला आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ‘मी परत येतोय’ या घोषवाक्य घेऊन सुरू आहे. त्याला टोमणा मारत ‘मी पस्तावतोय’ असा उल्लेख या फलकावर करण्यात आला आहे. जागोजागी लावलेल्या या फलकामुळे कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली. ही पोस्टर्स लावल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी ही पोस्टर्स काढली. त्यामुळे कोल्हापुरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे पोस्टरयुद्ध पाहायला मिळाले.

Leave a Comment