सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
निकृष्ट दर्जाच्या पुलाच्या संदर्भात बांधकाम विभागात गेलेले मनसेचे युवानेते अभिषेक शिंदे यांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांच्यावर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी, महाबळेश्वर येथील देवसरे कदम वस्ती पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामासंदर्भात मनसे नेते अभिषेक शिंदे यांना आलेल्या पत्राची शहानिशा करण्यासाठी ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेले होते. यावेळी सभापती संजय गायकवाड व सुभाष कारंडे यांनी अभिषेक शिंदे यांना कार्यालयाबाहेर अडवून तुझा कदम वस्ती पुलाच्या कामाशी काही संबंध नाही, तू यामध्ये पडू नको असे म्हणत दमदाटी व शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान मारहाणीत बरगडीला मार लागल्याने अभिषेक शिंदे यांच्यावर महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात संजय गायकवाड व राष्ट्रवादीचे नेते सुभाष कारंडे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे. अधिक तपास महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत करत आहे.