‘मी मुख्यमंत्री पदावर असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झालीय’- देवेंद्र फडणवीस

पुणे । मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली असं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ”आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं,” असंही ते म्हणाले आहेत. आम्ही शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून ते भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणत आहेत. मात्र, आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी समजू नये, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. (Devendra Fadnavis) ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. आम्ही पण महाराष्ट्रातीलच नेते आहोत, आम्हालाही राज्याच्या अस्मितेचे भान आहे. आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याला महाराष्ट्रद्रोही म्हणायचं, अशी शिवसेनेची कार्यपद्धती आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. निष्क्रिय सरकारविरूद्ध मोठा रोष जनतेत आहे. शेतकर्‍यांना कोणतीही मदत नाही. वीजबिलांचा घोळ त्यामुळे मोठा असंतोष आहे आणि तो या निवडणुकीतून व्यक्त होईल. आमच्या एकाही आंदोलनाची दखल घेतली नाही, एकाही पत्राला उत्तर नाही, कधी कोणती बैठक घेत नाही. या सरकारला प्रश्न सोडवायचे नाही. अशावेळी जनतेचे दु:ख मांडले गेले पाहिजेत आणि तेच आम्ही आंदोलनांच्या माध्यमातून मांडतो आहोत, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

“आम्हाला आनंद आहे की किमान पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरती तरी त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली आहे,” असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला. “मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून केवळ वेळकाढूपणा चालू आहे. त्यामुळे केवळ मराठाच नाही, तर सार्‍याच समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले जात आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रारंभीपासून सरकारने लक्षच दिले नाही,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. ‘आज आम्ही सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. सरकार पडण्याची वाट पाहत बसलेलो नाही. पण, हेही तितकेच खरे आहे की, अशी अनैसर्गिक सरकारे फार काळ चालत नाहीत. ज्यादिवशी पडेल, त्यादिवशी एक सक्षम सरकार राज्याला देऊ,” असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

You might also like