महाराष्ट्र केसरीला बक्षीसच नायं : पृथ्वीराज पाटील म्हणाला…

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महाराष्ट्र केसरी किताबाचा विजेता कोल्हापुरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या प्रकाश बनकरला आस्मान दाखवत मानाची गदा मिळवली. मात्र, या झालेल्या स्पर्धेनंतर बक्षीसच न मिळाल्याची खंत पृथ्वीराज पाटील यानं बोलून दाखवली. काल शनिवारी झालेल्या स्पर्धेत इतिहास घडला होता. अवघ्या 19 वर्ष वयाच्या पृथ्वीराजने कोल्हापुरचं नाव कुस्ती क्षेत्रात सुवर्ण अक्षरात कोरले. पण त्याला बक्षीसच न दिल्याचे वृत्त वाऱ्या सारखे पसरले.

साता-यात झालेली उपेक्षा ही गंभीर असल्याचे सध्या बोलले जात आहे. या प्रकारावर जागतिक कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या सोनबा गोंगाने याने सुद्धा आवाज उठवला. कुस्ती खेळणारे मल्ल हे गरीब कुटुंबातुन येतात. यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख रक्कम दिली गेली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

कुस्ती मैदानावर पुढाऱ्यांची फाैज तरीही उपेक्षा?

साताऱ्यात काल झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेवेळी मंत्र्यापासून खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य ते दिग्गज उपस्थित होते. केवळ मनोरंजन म्हणून या खेळाकडे व स्वताः ची पाठ थोपविण्याचा कालचा प्रकार म्हणावा लागेल. कारण कुस्तीला वेगळा दर्जा मिळवून देवू आम्ही काय केले, अशा बढाया अनेकांनी माईकवरून हाणल्या. मात्र अवघ्या 19 व्या वयात गदा पेलणाऱ्या पृथ्वीराजला बक्षीस स्वरूपात रोख रक्कम देण्यात सातारकर कमी पडले असेच म्हणावे लागेल.