अंनिसतर्फे आयोजित पहिल्या ई-नाट्य स्पर्धेत डी. जी. रुपारेल कॉलेज अव्वल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पनवेल प्रतिनिधी | नाजूका सावंत

शहीद डाॅक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाच्या निषेधार्थ ‘हिंसा के खिलाफ मानवता की और’ या अभियानाअंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल शाखेतर्फे सलग दुसऱ्या वर्षी विवेक जागर करंडक नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कोरोना संकटाच्या काळात या स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं होतं. राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला लाभला.

१८ ॲागस्ट रोजी १२ महाविद्यालयीन गटांनी ई-नाट्य सादरीकरण केले.
‘एक नवी सुरुवात’ या नाटकाचे सादरीकरण केलेल्या डी. जी. रुपारेल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर जे. एस. एम काॅलेज अलिबाग यांनी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे 4,000 आणि 3000 रुपये बक्षिस व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. ए. सी. पाटील खारघर कॉलेजने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावत 1000 रुपये रोख व मानचिन्ह मिळवले. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून विश्वनिकेतन कॉलेज खालापूर येथील ऋषिकेश गोसावी याचा तर सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून आर जे शहा काॅलेजच्या हर्ष सावंत याचा सत्कार करण्यात आला. दोन्ही विद्यार्थ्यांना 500 रुपये रोख रक्कम आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

अलिबाग, खालापूर, महाड, पुणे, कोल्हापूर मुंबई, नवी मुंबई, औरंगाबाद, नागपूर इत्यादी ठिकाणांहून आलेल्या पथकांनी यावेळी कोरोनाकाळात जी भीती आहे ती संपवायची असेल तर समाजमाध्यमं, प्रसारमाध्यमे यांच्याबरोबर नसगरिकांची भूमिकाही महत्त्वाची आहे हा संदेश देणारी तसेच स्त्रीभ्रूणहत्या, कौटुंबिक हिंसाचार यावर भाष्य करणारी नाटकं सादर केली. हिंसेच्या प्रकारात मानसिक हिंसाचार, धार्मिक तेढ असल्यामुळे होणारे हिंसाचार, सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर होणारे झुंडबळी आशा अनेक प्रकारच्या हिंसेला नाकारत त्यापुढे जाऊन मानवतेचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या नाटकातून दिला. त्यासाठी ऑनलाईन माध्यमाचा उत्तम वापर करून स्वलिखित गाण्यांचा समावेश सादरीकरणात करण्यात आला. यावेळी कोरोना आणि त्यामागील भीती यावरील सादरीकरणावरही तरुणाईचा भर होता.

यावेळी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले रेखा ठाकूर, कृतार्थ शेवगावकर आणि प्रतीक जाधव यांनी तरुणाईला प्रश्न पडले आणि त्यांनी प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न केला याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. रंगमंचावर कधी जातोय अशी उत्सुकता लागलेल्या कलाकारांना ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल महाराष्ट्र अंनिसच्या पनवेल शाखेचे अभिनंदनही विद्यार्थ्यांनी केले.

डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला ७ वर्षं पूर्ण होत आहेत. मारेकरी पकडले असले तरीही खरा सूत्रधार सापडलेला नाही याचा निषेध करणारी तरुणाई लोकांना आश्वासक वाटत आहे. नाट्य स्पर्धेत सहभागी होऊन सभोवताली घडणाऱ्या अनेक प्रकारच्या हिंसेला सांस्कृतिक मार्गाने उत्तर देणाऱ्या तरुणांचे सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी कौतुक केले. 

Leave a Comment