यंदाच्या गणेशोत्सवाचं खास आकर्षण – ‘चाळीतील बाप्पा’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गणेशोत्सव 2020 | दरवर्षीचा गणेशोत्सव म्हणजे अनेकांसाठी एक पर्वणीच असते. उत्साहाचे वातावरण, जल्लोष, मोदक, देवांच्या आरत्या, सकाळपासुन रात्री दहापर्यंत चालु असणारे साऊंड्स, गर्दी या सगळ्यात आपण हरवुन जायचो. पण यंदा कोरोनामुळे सगळ्याच गोष्टींना ब्रेक लागला. गणपती उत्सवावर ही याचं सावट आलं. त्यामुळे नेहमी असणारा उत्साह,जल्लोष यंदा थांबला. पण मुंबईच्या पराग सावंत यांच्या डोक्यात मात्र या निरुत्साही वातावरणात देखील एक भन्नाट कल्पना आली. ते स्वत: गणेशोत्सव साजरा करता येणार नसल्याने हिरमुसले होतेच पण तरीही स्वत: ते सिनेमॅटोग्राफर असल्याने त्यांच्या कल्पना त्यांना शांत बसु देत नव्हत्या. गेली काही वर्षे घरीच हलते देखावे सादर करणाऱ्या पराग सावंत यांनी यंदा “चाळीतला सार्वजनिक गणपती” या थीमवर देखावा बनवण्याचे काम करायला सुरुवात केली. चाळीेचे रहिवासी असल्याने उत्सवाचे बदलते स्वरुप ते काही वर्षे पहात होते. या बदलत्या काळात चाळसंस्कृती लोप पावत चाललीये.

हल्ली गणपती आलेत पण आल्यासारखे वाटत नाहीत, नी पुर्वीसारख्या काही गोष्टी आता होत नाहीत याची खंत देखील त्यांना वाटत होती. त्यात कोरोना.. त्यामुळे यंदा त्यांना गणपती उत्सव कसा साजरा करावा हे समजत नव्हतं. ते म्हणाले, “मुळात कोरोना नाहीचय, हेच डोक्यात ठेऊन चाळीतला गणपती या थीमवर काम करायचं होतं. जेणेकरुन ती सकारात्मकता, आणि उत्साह या कलाकृतीमधे येईल आणि काम सुरु झालं. पण विषय असा की लॉकडाऊन नसलं तरी एकत्र येऊन मुंबईतल्या मुंबईत काम कसं करायचं. थोड्या विचाराअंती यातुन एक मार्ग निघाला. या देखाव्यावर काम करणाऱ्या प्रत्येकाकडे त्यांना जमेल त्या गोष्टीचं काम सोपवायच. त्यांना ते काम समजुन सांगायचं. नी नंतर ते झाल्यानंतर सर्वांनी चर्चेतुन अजुन अॅडिशनल क्रियेटिव्ह काही करता येईल का यावरही काम करायचं. पराग सावंत यांच्या कल्पनेतुन साकारलेल्या या देखाव्याला वेदांत वायकर, चेतन वारंगकर, आणि इतर साथीदारांनीही हातभार लावला.

मुळात पराग यांंना हा देखावा तयार करताना अडथळे ही होते. दुकाने बंद होती, नाहीतर ज्या वस्तु लागणार होत्या त्या उपलब्ध नव्हत्या. पण त्यातुन त्यांनी सर्व गोष्टी जमवत हा “चाळीतला गणपती” चा देखावा केला आणि बघता बघता तो जगप्रसिद्ध ही झाला. या देखाव्यातली प्रत्येक गोष्ट नकळतपणे आपल्याशी संवाद साधते. आणि जुन्या काळाशी आपल्याला जोडत नेते. व्हरांड्यात पेपर वाचत असलेला माणुस, त्याच्याशेजारी असणारा पाण्याचा ड्रम, दारावर लावलेली तोरणं, सिलेंडर, कॅरमबोर्ड, चपला, रांगोळी, दारे, खिडक्या, भिंतीला टेकवलेली बॅट, दोन्ही बाजुला जुन्या पद्धतीचे कर्णे, आणि चाळीच्या मधोमध विराजमान असलेला गणपती…. देखाव्यात असणारं हे सारंकाही आपल्याशी कळत नकळतपणे संवाद साधत राहतं.

पुलं देशपांडे यांनी बटाट्याची चाळ लिहली. ती चाळ कशी असेल हे वाचताना लक्षात येतं आणि आपण बटाट्याची चाळ वाचताना त्यात शेवटपर्यंत गुंग होऊन जातो. पण पराग सावंत यांनी साकारलेल्या ह्या सार्वजनिक चाळीच्या प्रतिकृतीचा देखावा पाहिल्यावर पुलंची बटाट्याची चाळ ही अशीच असेल इतका जिवंतपणा वाटतो. पराग यांनी स्वकष्टाने आणि टीमच्या मदतीने या देखाव्यात तो आणलाय. ते स्वत: चाळीत राहत असल्याने त्यातले बारकावे या देखाव्यात त्यांनी खुप कौशल्याने भरलेत. या देखाव्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हा आम्हाला भावनिक करते आणि अचंबितही. मुळात ह्या देखाव्याचा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना हा मंडळापुढचा देखावा वाटला होता. पण नंतर समजलं की हा देखावा तर घरातच तयार केलाय. तो ही साडेतीन बाय चारचा !!

गणेशोत्सव हा मुळातच अनेकांच्या क्रियेटिविटीला ऊर्जा देणारा उत्सव. आणि कलाकृती, मग ती कोणतीही असो त्यात जिवंतपणा आणणं हे कौशल्याचे काम असतं. या देखाव्यात ते अगदी पुरेपुर आहे. यंदाच्या कोरोना काळातल्या गणपतीत पराग सावंत यांनी त्यांच्या घरी बनवलेला हा “चाळीचा सार्वजनिक गणपती देखावा” अनेकांना आश्चर्यचकित करतोय. अचंबित करतोय अन भावनिक ही करतोय. आणि त्यात पेरल्या गेलेल्या बारकाव्यांपुढे नतमस्तक ही करतोय. महामारीमय वातावरणातही या घरगुती देखाव्याने मात्र उत्साह, सकारात्मकता आणि आनंद पसरवलाय हे नक्की..

– विकी पिसाळ
9762511636

Leave a Comment