महाराष्ट्र कन्या प्रांजल पाटील बनली पहिली महिला नेत्रहीन उपजिल्हाधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतीनिधी । आधी अंधत्व आणि त्यानंतर सरकारची डोळेझाक. अडथळ्यांची शर्यत पार करत पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नेत्रहीन प्रांजल पाटीलने आणखी एक गड सर केला आहे. केरळ मधील तिरुअनंतपुरमची उपजिल्हाधिकारी म्हणून मराठमोळी प्रांजल रुजू झाली आहे.

केरळ मधील पहिली दृष्टीहीन महिला उपजिल्हाधिकारी बनण्याचा बहुमान प्रांजलला मिळाला आहे. प्रांजलला डावलणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून तिने घवघवीत यश मिळवलं. मूळ जळगावची असलेली प्रांजल उल्हासनगरला राहते. तिची दृष्टी जन्मतःच अधू होती. वयाच्या सहाव्या वर्षी तिने दृष्टी कायमची गमावली. मात्र समस्यांपुढे गुडघे टेकेल, तर ती प्रांजल पाटील कसली.

आयुष्यात काहीतरी करुन दाखवण्याच्या जिद्दीतून तिने एक-एक अडथळे पार केले. दादरच्या कमला मेहता स्कूलमध्ये तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. ब्रेल लिपीमध्ये शिकत प्रांजलने दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर उल्हासनगरच्या चांदीबाई महाविद्यालयात ती कला शाखेतून बारावी उत्तीर्ण झाली. यावेळीही तिने थोडे-थोडके नव्हे, तर चक्क ८५ टक्के गुण मिळवले होते. मुंबईतील सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून प्रांजलने बीए केलं. पदवीधर झाल्यावर प्रांजलने यूपीएससी परीक्षा देण्याचा निश्चय केला होता. दिल्लीत जाऊन जेएनयू महाविद्यालयातून मास्टर्स शिक्षण तिने पूर्ण केलं. त्यानंतर अभ्यास करुन प्रांजलने थेट यूपीएससीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात ती ७७३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

Leave a Comment