गद्दारी लपून राहावी यासाठीच गोपीचंद पडळकरांकडून भडक वक्तव्ये: विक्रम ढोणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती| गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणप्रश्नी मॅनेज होवून, तसेच उच्च न्यायालयातील एफिडेव्हिटसंबंधी खोटी माहिती देवून समाजाशी गद्दारी केली आहे. त्या गद्दारीची चर्चा होवू नये म्हणून पडळकरांनी भडक वक्तव्ये सुरू केली आहेत, अशी टीका धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. धनगर आरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या व्होट बँक पॉलिटिक्समधून समाजाचे शोषण सुरू असल्याचे नमूद करून ढोणे म्हणाले, पडळकर यांचे सामाजिक नेतृत्व ही सूज आहे. पडळकरांनी सहा महिने सभांमधून समाजाच्या भावना भडकावल्या आणि स्वत:चा स्वार्थ साधताच कथित आंदोलन गुंडाळले. देवेंद्र फडणवीस- चंद्रकांत पाटील यांच्या सोयीसाठी आणि स्वत:च्या आमदारकीसाठी समाजाशी गद्दारी केली. या गद्दार व्यक्तीचे नेतृत्व समाजावर थोपवण्याचे प्रयत्न भाजप नेतृत्वाकडून सुरू आहे.

पडळकर हे या दोन्ही नेत्यांचे प्यादे आहे, हे यापुर्वीच स्पष्ट झाले आहे. पडळकरांना भाजपकडून आमदारकी मिऴावी म्हणून त्यांनी कथित आंदोलन सुरू केले होते. स्टेजवरून भाजपला शिव्या घालण्याची भाषा करताना प्रत्यक्षात फडणवीस- पाटलांशी ऑफरची चर्चा करत होते. लोकसभेच्या निवडणुकीअगोदर पडळकरांनी महाड ते मुंबई आंदोलन जाहीर केले. सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय मुंबईतून उठणार नाही, सर्टिफिकेट नाही मिळाले तर आम्ही भाजपचे सरकार पाडणार, अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात पडळकर समाजाला वाऱ्यावर सोडून स्वत:च्या आमदारकीची तजवीज करून परत आले. येताना देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देवून आले. त्यानंतर काही दिवसांतच चंद्रकांत पाटलांनी पडळकरांना दिलेल्या ऑफरबाबत सांगलीत पत्रकार परिषदेत सांगितले होते. पुढे तसेच घडले. मॅनेज पडळकरांना भाजपने पक्षात घेतले आणि आमदार केले. पडळकर हे भाजपचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या डोक्यातील एजेंडा हा फडणवीस- चंद्रकांत पाटलांचा आहे. धनगर समाजाचा नाही. त्यामुळे आमदारकीला महिना होण्याच्या आत त्यांनी भडक वक्तव्ये सुरू केली आहेत. अशा वक्तव्यामुळे जातीजातीत तणाव निर्माण करून समाजाला मूळ मुद्यापासून बाजूला नेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एसटी आरक्षण अंमलबजावणीचे आश्वासन पाळले नाही. ‘टिस’सारख्या संस्था नेमून सर्वे करण्याचे नाटक केले. सर्वांत महत्वाची बाब म्हणजे उच्च न्यायालयातील केसमध्ये दाखल केलेल्या एफिडेव्हिटसंबंधी समाजाला खोटी माहिती दिली. ‘धनगर आणि धनग़ड एकच आहेत’ असे एफिडेव्हिट दिल्याचे पडळकर सांगत आहेत, मात्र तशी वस्तुस्थिती नाही. ही फसवणूक करणाऱ्या फडणवीसांनी धनगर आरक्षणाचे क्रमांक एकचे विरोधक मधुकर पिचड यांना आदर्श नेते म्हणून भाजपात घेतले. हे सर्व करणाऱ्या फडणवीसांना गॉडगिफ्ट म्हणणे, ही पडळकरांची मोठी गद्दारी आहे. या एफिडिव्हेटची वासलात लागून लवकरच समाजाला वस्तुस्थिती कळेल. पण सर्व प्रमुख पक्षांना एफिडेव्हिटचे कारण देण्याची संधी मिळाली आहे. सद्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्या एफिडेव्हिटचे पालुपद लावले आहे. कोणताच पक्ष हा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भातील बरीचशी घाण पडळकर यांनी करून ठेवली आहे.

पडळकरांची ही गद्दारी समजून घेवून बारामतीच्या धनगर समाजाने विधानसभा निवडणुकीला जो धडा शिकवला त्याचे कौतुक आहे. महाजनादेशाचा दावा करणाऱ्या फडणवीसांच्या पक्षाचा राज्यात सर्वाधिक मतांनी बारामतीत पराभव केला. डिपॉझिट जप्त केले, शिवाय भाजपचे 30 हजार मतदान घटवून दाखवले. यानिमित्ताने बारामतीच्या धनगर समाजाने राज्याला चांगला संदेश दिल्याचे ढोणे म्हणाले.

आता आरक्षणासंबंधाने धनगर समाज सावध झाला असतानाच भाजपने पडळकरांच्या तोंडातून वादग्रस्त वक्तव्य घडवून आणले. कोरोनाविरूद्ध सर्वजण लढत असताना, शेकडो लोकांचे जीव जात असताना पडळकरांना घाणेरडे पक्षीय राजकारण सुचते आहे. हा प्रकार मोठ्या षढयंत्राचा भाग आहे. पडळकरांनी फडणवीस- चंद्रकांत पाटलांची चमचेगिरी करण्यासाठी हे विधान केले आहे. धनगर समाजाला भडकविण्याचा त्यापाठीमागे। ब उद्देश आहे. भावनिक झालेला समाज भाजप आणि पडळकरांनी केलेली गद्दारी विसरून जाईल, असे त्यांना वाटते आहे. त्यामुळे भाजपच्या षढयंत्राला समाजाने बळी पडू नये, असे आवाहन ढोणे यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment