मनसेच्या कट्टर समर्थकाची आत्महत्या

नांदेड प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुंबईबाहेरील पहिला समर्थक असणाऱ्या संभाजी जाधव यांनी आत्महत्या केली आहे. संभाजी जाधव विद्यार्थी दशेपासूनच राज ठाकरे यांच्या संपर्कात होते. विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून संभाजी जाधव यांनी नांदेडमध्ये चांगलं काम केलं होतं. व्यवसायाने शेतकरी असलेल्या संभाजी जाधव यांच्या शेतीवरील कर्ज वाढलं होतं. त्या नैराश्यातून 46 वर्षीय संभाजींनी जीवनयात्रा संपवली.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेच्या स्थापनेची घोषणा केली होती, त्या घोषणेनंतर संभाजी यांनी शिवसेनेच्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. राज ठाकरेंसोबत जाणारे संभाजी जाधव हे मराठवाड्यातील पहिले पदाधिकारी होते. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे स्वतः संभाजी जाधव यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. संभाजी जाधव पदावर असो अथवा नसो राज ठाकरे नांदेडला आले की संभाजी जाधव यांची भेट ठरलेली असे. राज ठाकरेंच्या इतक्या जवळच्या कार्यकर्त्याने कर्जाच्या भीतीने आत्महत्या केल्याने नांदेडमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संभाजी जाधव हे नांदेडजवळच्या डौर गावचे रहिवासी होते. याच गावात त्यांची वडिलोपार्जित जमीन होती. ते स्वतः नांदेड शहरातील तरोडा नाका भागात राहत असत. याच घरात मध्यरात्री त्यांनी गळफास घेत जीवन संपवलं. गेल्या चार वर्षांपासून कायम दुष्काळी स्थिती असल्याने शेतीचं कर्ज वाढलं होतं. त्यातून हतबल झाल्याने संभाजी जाधव यांनी जीवन संपवल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वीच राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्याने मुंबईजवळच्या मनसैनिकाने आत्महत्या केली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com