जुलै अखेरपर्यंत ११ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या राज्यातील ११.१२ लाख शेतकर्‍यांना जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी निधी अभावी ठप्प झाली होती. त्यामुळे राज्यातील ११.१२ लाख शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ झाले नव्हते.

यानुसार ११.१२ लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यातील ८१०० कोटी रुपये जुलै अखेरपर्यंत जमा केले जाणार आहेत. राज्यातील ३२ लाख शेतकर्‍यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. या ३२ लाखांपैकी मार्च २०२० अखेरीस १९ लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये १२ हजार कोटी रुपये सरकारने भरले आहेत. तर उरलेल्या ११.१२ लाख शेतकर्‍यांच्या खात्यात जुलै अखेरपर्यंत ८१०० कोटी रुपये जमा केले जाणार आहेत.

राज्यातील ११.१२ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी होऊ शकली नव्हती अशा शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य सरकारने बँकांना दिल्या होत्या. मात्र आपली कर्जमाफी कधी होणार याची वाट हे शेतकरी बघत होते. अखेर या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. जुलै अखेरपर्यंत या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment